नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटावर सवलत कधी दिली जाईल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत देण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. किंबहुना तसा निर्णय घेतला जाणार नाही. भारतीय रेल्वे अपंग व्यक्तींच्या चार श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींसाठी भाड्यात सवलत देत राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेत एम आरिफ यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणाले की, “भारतीय रेल्वे आधीच ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांच्या प्रवास खर्चाच्या ५० टक्क्यांहून अधिक खर्च उचलत आहे. शिवाय, कोविडमुळे २०१९-२० च्या तुलनेत गेल्या दोन वर्षांतील रेल्वेची कमाई कमी होती. याचा रेल्वेच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला आहे.”
रेल्वेच्या आकडेवारीनुसार, २०२९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये आरक्षित वर्गात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या अनुक्रमे ६.१८ कोटी, १.९० कोटी आणि ५.५५ कोटी होती. गेल्या दोन वर्षांत ज्येष्ठ नागरिक श्रेणीतील प्रवाशांच्या संख्येत झालेली घट कदाचित कोविड महामारीमुळे असावी. २०१९-२० मध्ये रेल्वेच्या शाश्वत विकासासाठी सुमारे २२.६ लाख ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी प्रवासी भाडे सवलत योजना वगळण्याचा पर्याय निवडला असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी सभागृहाला दिली.
Railway Minister on Senior Citizen Ticket Concession