नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशामध्ये तब्बल ३ रेल्वे गाड्यांचा भीषण अपघात होऊन २८८ जमांचा बळी गेला आहे. या अपघाताची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी विरोधकांसह विविध स्तरातून होत आहे. या अपघातामुळे वैष्णव हे विशेष चर्चेत आले आहेत. त्यांच्याकडे रेल्वे आणि आयटी अशा दोन मंत्रालयांची जबाबदारी आहे. याचनिमित्ताने जाणून घेऊया वैष्णव यांच्या कारकीर्दीविषयी..
अश्विनी वैष्णव हे माजी सनदी अधिकारी आहेत. प्रशासनात त्यांनी चांगली छाप पाडली होती. ते प्रथमच केंद्रीय मंत्री झाले. त्यांना थेट कॅबिनेट दर्जा मिळाला आहे. खरे म्हणजे नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांचा समावेश हा अनेकांना आश्चर्यचकित करणारा ठरला.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी ओडिशा येथून राज्यसभेची निवडणूक भाजपाच्या तिकिटावर जिंकून सर्वांना चकित केले होते. राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेल्या ५१ वर्षीय वैष्णव हे १९९४ च्या बॅचचे ओडिशा केडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. आयएएस अधिकारी म्हणून त्यांनी १५ वर्षे अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.
अश्विनी वैष्णव हे सार्वजनिक व खासगी भागीदारी (पीपीपी) चौकटीत केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी परिचित आहेत. आयआयटी पदवीधर असलेल्या वैष्णवने २००८ मध्ये आपली नोकरी सोडली आणि ते अमेरिकेत वार्डन विद्यापीठात गेले, तेथून त्यांनी एमबीए केले. अनेक नामांकित कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर ते देशात परत आले आणि गुजरातमध्ये त्यांनी स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट उघडले. त्यानंतर त्यांनी जनरल इलेक्ट्रिक आणि सीमेन्स यासारख्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले.
वैष्णव यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्याने भारतीय रेल्वेची कमाई वाढविण्याच्या मार्गांचा विचार केला जाईल असे बोलले गेले. रेल्वेच्या विकासासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलचा मार्ग खुला करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेची अनेक टप्प्यांत खासगी गाड्या सुरू करण्याची योजना आहे. त्यांच्या नेतृत्वातच वंदे भारत या स्वदेशी बनावटीची हायस्पीड रेल्वे लॉन्च करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या सहा दिवस आधी वैष्णव भाजपमध्ये दाखल झाले होते. त्याचप्रमाणे प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी बालेश्वर आणि कटक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली. १९९९ मध्ये झालेल्या चक्रीवादळा दरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून आपले कौशल्य दाखविले आणि त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. वैष्णव यांनी २००३ पर्यंत ओडिशामध्ये काम केले आणि त्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यालयात उपसचिव झाले. त्यानंतर वैष्णव यांना वाजपेयी यांचे सचिव बनविण्यात आले होते.
Railway Minister Ashwini Vaishnav Journey