नवी दिल्ली – देशाची लाईफ लाईन म्हटली जाणारी रेल्वे आता ऑक्सिजनची जीवनवाहिनी होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी खाण्या-पिण्याच्या वस्तूंना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याची मदत केलेली आहे. वेळेप्रसंगी पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात पाणीही पोहचवले. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पोहोचवून रेल्वे शेकडो जणांचा जीव वाचवण्याचे महत्त्वाचे काम करणार आहे. रेल्वेने खास ऑक्सिजन एक्सप्रेस सज्ज केली आहे. महाराष्ट्रासाठी पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस सज्ज झाली आहे.
क्रायोजेनिक टँकरना वैद्यकीय वापरासाठी द्रव्य ऑक्सिजनच्या परिवहनाला रेल्वेने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने विनंती केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध स्थानकांपर्यंत द्रव्य स्वरूपातील ऑक्सिजनला रोल ऑन रोल ऑफ सेवेअंतर्गत पोहोचवण्यात येणार आहे, असे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. याचा खर्च राज्य सरकारलाच करावा लागणार आहे. पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ही कळंबोली येथून दहा रिकामे ऑक्सिजन टँकर्स हे बोकारो, राऊरकेला, जमशेदपूर आणि वायझॅक याठिकाणी जात आहेत. तेथून ऑक्सिजन घेऊन ही एक्सप्रेस पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेससाठी रेल्वेकडून खास ग्रीन कॉरिडॉर केला जाणार आहे.
लोड केल्या जाणाऱ्या कंटेनरसोबत जाणार्या कर्मचार्यां ना द्वितीय श्रेणीचे तिकीट घ्यावे लागणार आहे. फक्त दोन कर्मचार्यांना सोबत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रथम महाराष्ट्र आणि आता दिल्ली सरकारने वैद्यकीय सेवेसाठी ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याचे म्हटले होते.
क्रायोजेनिक कंटेनरना विशेष रेल्वे वॅगनच्या माध्यमातून जवळच्या शहरांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. त्यानतंर संबंधित ट्रक आपल्या निर्धारित ठिकाणी ऑक्सिजन घेऊन पोहोचणार आहे. त्यामुळे वैद्यकीय ऑक्सिडन पोहोचवण्यासाठी परिवहनाचा खर्च आणि वेळेची बचत होणार आहे.
https://twitter.com/RailMinIndia/status/1383752043265855490