विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महिला डब्यांमधून अनधिकृत प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांविरुध्द आरपीएफने देशभरातील रेल्वेस्थानकावर १ लाख २९ हजार ५०० पुरुषांना रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अन्वये अटक केल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ पासून ते मे-२०२१ पर्यंत ही अटकेची कारवाई केली असून या पुरुष प्रवाशांविरुध्द आरपीएफद्वारे खटलेही दाखल केले आहे. त्याचप्रमाणे आरफीएफने २०१७ ते मे २०२१ या काळात एकूण ५६३१८ बालकांची संकटातून सुटका करण्यात आली आहे. तर २०१८ ते मे २०२१ या काळात एकूण ९७६ बालकांना मानवी तस्करांकडून सोडविण्यात आले आहे.
बालकांच्या सुटकेसाठीही आरपीएफने सदैव महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाशी सल्लामसलत करून एसओपी म्हणजे प्रमाणित प्रचालन प्रक्रियाही तयार करण्यात आली आहे. २०२० पर्यंत १३२ स्थानकांवर नामनिर्देशित सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींच्या मदतीने बाल सहाय्य केंद्रेही चालविण्यात येत आहेत.
प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आरपीएफ सातत्याने प्रयत्न करीत असते. तक्रार-निवारण, राहून गेलेले सामान परत मिळवून देणे आणि सुरक्षेशी संबंधित संपर्कयंत्रणा या बाबतींत आरपीएफ अतिशय सक्रिय असते. २०१९ पासून ते मे २०२१ या काळात राहून गेलेल्या सामानाची २२८३५ प्रकरणे सोडवून ३७ कोटी १३ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू त्यांच्या त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचविण्यात आरपीएफला यश आले आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये (२०१९-२०) अखिल भारतीय रेल्वे सुरक्षा मदत क्रमांक- १८२ यावर एकूण ३७२७५ सुरक्षाविषयक समस्या नोंदवल्या जाऊन त्यांची योग्य ती दखल घेतली गेली आहे. १ एप्रिल २०२१ पासून १८२ ही हेल्पलाईन रेलमदत या १३९ क्रमांकामध्ये विलीन करण्यात आली आहे. एप्रिल आणि मे २०२१ मध्ये, १२९ क्रमांकावर आलेले ८२५८ सुरक्षाविषयक समस्या सांगणारे फोन घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे.