मुकुंद बाविस्कर, मुंबई
रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुषखबर आहे. खासकरुन रेल्वेच्या विविध इमारतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी. कारण, विविध प्रकारचा त्रास सहन करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना रेल्वे मंत्रालय मोठा दिलासा देणार आहे.
स्वातंत्र्यानंतर गेल्या सात दशकांपासून रिकाम्या पडलेल्या हजारो हेक्टर रेल्वेच्या अत्यंत किमती जमिनीवर बहुमजली इमारती, निवासी वसाहती, व्यापारी संकुले इत्यादी बांधण्याच्या योजनेवर केंद्र सरकार वेगाने काम करत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे १०० वर्षे जुन्या रेल्वेच्या मोडकळीस आलेल्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या लाखो रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन सदनिका मिळणार आहेत. महाराष्ट्राचा देखील या योजनेत समावेश करावा अशी मागणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केली आहे.
या योजनेबरोबरच भाडेतत्त्वावरील जमिनीवरील रिअल इस्टेट विकासकामार्फत सर्वसामान्यांना बाजारापेक्षा स्वस्तात फ्लॅट उपलब्ध करून देण्यात देतील. यामुळे केंद्राच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये जमा होतील. या योजनेवर काम करणाऱ्या रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणने गुवाहाटी, हैदराबादसह तीन ठिकाणी रेल्वे वसाहतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू केले आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यांतील विविध शहरांमध्ये बहुमजली इमारती, वसाहती, व्यापारी संकुल, डीपीआर आदींच्या बांधकामासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज रेल्वे स्टेशनच्या प्रस्तावित जागेवर सात हेक्टर जमीन भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. येथे बहुमजली इमारत व व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. तसेच गोखरपूर, वाराणसी, लखनौ, मुरादाबाद, झाशी, आग्रा इत्यादी ठिकाणी मोडकळीस आलेल्या रेल्वे वसाहतींच्या जागी बहुमजली फ्लॅट क्वार्टर बांधण्यात येणार आहेत. बरेलीच्या इज्जतनगरमध्ये रेल्वे कर्मचारी निवासस्थान, कार्यालय, आरोग्य सेवा केंद्र इत्यादी बांधल्या जातील आणि रेल्वेची जमीन भाडेतत्त्वावर दिली जाईल.
महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, मनमाड, इगतपुरी, भुसावळ, जळगाव, कोल्हापूर यासारख्या शहरांमध्ये देखील रेल्वेच्या मालकीची मोठी रिकामी जागा असून या ठिकाणी देखील अशाप्रकारे निवासी संकुले उभारण्यात यावीत, अशी अपेक्षा रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली असून याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना साकडे घालण्यात येणार आहे. पाटणा, बिहार आणि झारखंडमधील टाटानगर येथील टीटीइ विश्रामगृह येथे १० हेक्टर जागेवर बांधकाम केले जाणार आहे.
देशभरातील ८४ ठिकाणी नवीन वर्षात बांधकामाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षात देशभरातील ८४ ठिकाणी बांधकाम सुरू होईल. यामध्ये ६०० हेक्टर जमीन भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. तसेच २५ हजार रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर फ्लॅट बांधले जातील. रेल्वेची जमीन पारदर्शक बोली प्रक्रियेद्वारे ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाईल. तसेच १०० ठिकाणी व्यावसायिक ग्रीनफील्ड साइट्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि रेल्वे कर्मचारी यांच्या निवासी घरांचा प्रश्न सुटणार आहे.