नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईच्या झळा सोसणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागाने मोठी खूशखबर दिली आहे. रेल्वे विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाचवेळी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. याबरोबरच १० महिन्यांचा फरकदेखील मिळणार आहे. या निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र आनंदाचे वातावरण आहे.
रेल्वे विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात एकाचवेळी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. ज्यांना सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळतो त्यांच्यासाठी ही वाढ करण्यात आली असून, त्यामुळे त्यांच्या पगारात हजारो रुपयांची वाढ होणार आहे. त्याबरोबरच १० महिन्यांचा फरकदेखील मिळणार आहे. याबाबतचा आदेश रेल्वे बोर्डाने जारी केला आहे. रेल्वे बोर्डाने महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे.
त्यात म्हटले आहे की, सहाव्या वेतन आयोगांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जुलै २०२१ आणि १ जानेवारी २०२२पासून वाढवण्यात आला आहे. सहाव्या वेतन आयोगांतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ जुलै २०२१पासून सात टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच रेल्वे बोर्डाने १ जानेवारी २०२२पासून पुन्हा एकदा महागाई भत्त्यात सात टक्क्यांनी वाढ केली आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचा रेल्वे कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा होणार आहे. वित्त संचालनालय आणि रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाने हा निर्णय लागू केला आहे.
मार्चमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार मिळवणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. सध्या या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्के आहे. त्यांचे मूळ वेतन १८ हजार रुपये आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना सरकारने मूळ किमान वेतन ७००० रुपयांवरून १८००० रुपये प्रति महिना केले होते. रेल्वेच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.