मनीष कुलकर्णी, मुंबई
सर…मला १५ बोगी भाडेतत्वावर हव्या आहेत. खासगी रेल्वे चालवून प्रवशांना पुरी येथे घेऊन जाईन. हे निवेदन एका व्यापार्याने पाठविले आहे. रेल्वे विभागाच्या भारत गौरव यात्रा योजनेअंतर्गत पारंपरिक बोगी भाडेतत्वावर घेण्यासाठी व्यापार्याने हे निवेदन दिले आहे.
रेल्वे मंत्रालयाने सेवेचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार देशातील नागरिक किंवा खासगी कंपन्या रेल्वे बोगी भाडेतत्वावर घेऊन त्या वैयक्तिक किंवा सामुहिकरित्या चालवू शकणार आहेत. त्याअंतर्गत रेल्वे विभागाला देशभरातून अर्ज येत आहेत. त्यात रेल्वे बोगी चालविण्याची मागणी करण्यात येत आहेत. त्यानुसार एका व्यापार्याने अर्ज दिला आहे.
व्यापार्याच्या म्हणण्यानुसार, गोरखपूरपासून पुरीपर्यंत कोणतीही थेट रेल्वेसेवा नाही. या रेल्वेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना भगावन जगन्नाथ यांचे दर्शन करून देता येतील. ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीच्या दरात पुरीपर्यंत प्रवास करता यावा हाच व्यापार्याचा उद्देश आहे. व्यापार्याचे निवेदन मिळाल्यानंतर रेल्वे विभागाकडून बोगी उपलब्ध करून देण्यासह औपचारिकता पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. वाणिज्य विभागाच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, काही नागरिकांनीही लीज बद्दल कार्यालयात चौकशी केली आहे.
भाडेतत्वाचा करार बोगींच्या संपूर्ण आयुष्यापर्यंत वाढवला जाऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इच्छुक पार्टी स्वतः व्यावसायिक मॉडेल (जसे प्रवासाचा कार्याक्रम, भाडे आदी) चा विकास किंवा निर्णय घेईल. अशा प्रकारची रेल्वे सुरू झाल्यानंतर भाविकांची सोय होणार आहे. जेव्हा वाटेल तेव्हा प्रवासी प्रवास करू शकतील.
निवेदनात व्यापारी सांगतो, काही दिवसांपूर्वी त्यांच्या समाजाच्या नागरिकांना पुरीपर्यंत प्रवास करायचा होता. गोरखपूरपासून थेट रेल्वे नसल्याने प्रवाशांना वाराणसीला जावे लागले. वाराणसीतून बसद्वारे जाताना त्यांचे सामान चोरी झाले. पुरीला न जाता सगळे पुन्हा गोरखपूरला परतले. त्यानंतर गोरखपूर-पुरी अशी रेल्वेसेवा सुरू करावी यासाठी रेल्वे विभागाला अनेकदा पत्रे लिहिली. परंतु काहीही झाले नाही. त्यामुळे यंदा बोगी भाड्याने घेऊन पुरीपर्यंत जाण्याची संधी निर्माण झाली आहे.
किती भाडे द्यावे लागणार
ऑनलाइन नोंदणी करताना एका वेळी एक लाख रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम परत मिळणार नाही. नोंदणी केल्यानंतर १५ बोगी (६ श्रेणी ३ एसी, ६ शयनयान, एसएलआर-२ आणि पेट्रीकार) ३७,६१,००४ रुपये इतकी एकरकमी रक्कम जमा करावी लागेल. त्यानंतर याच १५ बोगींसाठी १५ वर्षांसाठीचे लीज शुल्क २५,२९४,६०६ रुपये द्यावे लागतील. त्यानंतर ९०० रुपये प्रतिकिमीच्या दराने प्रत्येक सहलीचे परिचालन शुल्क द्यावे लागेल.