मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
रेल्वे ही आपल्या देशाची रक्तवाहिनी समजले जाते, दररोज हजारो नव्हे तर कोट्यवधी नागरिक रेल्वेने प्रवास करतात. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांना वेगवेगळ्या सोयी सुविधा दिल्या जातात. परंतु आता रेल्वेने आपल्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना मोठा दणका दिला आहे. देशात हजारो ज्येष्ठ नागरिक रेल्वेने प्रवास करतात. मात्र आता सरकारच्या नव्या नियमानुसार त्यांच्यासाठी उपलब्ध असलेली एक मोठी सुविधा बंद होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे.
लोकसभेत रेल्वेच्या अनुदानाच्या मागण्यांवरील 13 तासांच्या चर्चेला रेल्वेमंत्री उत्तर देत होते. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात दिल्या जाणाऱ्या सवलतीवर बंधने येणार आहेत. म्हणजेच आता त्यांना भाड्यात सवलत मिळणार नसून त्यांनाही इतर प्रवाशांप्रमाणे पूर्ण भाडे भरावे लागणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाडे सवलत पुनर्स्थापित न करण्याबाबतच्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांमुळे 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-2021 या वर्षात प्रवाशांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत देण्यासाठी भारतीय रेल्वेचा खर्च तुलनेने जास्त आहे, असेही वैष्णव म्हणाले. त्यामुळे सध्यातरी ज्येष्ठ नागरिकांसह इतर सर्व श्रेणीतील प्रवाशांना रेल्वे भाड्यात सवलत देणे शक्य होणार नाही.
यावेळी वैष्णव आणखी म्हणाले की, आमच्या क्षमतेवर आम्हाला विश्वास ठेवायला हवा. तसेच वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 200 किमीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. रेल्वेमध्ये सुरक्षा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ‘कवच’ या स्वयंचलित संरक्षण प्रणालीच्या शोधामुळे आपण या दिशेने बरीच प्रगती केली आहे. तसेच रेल्वेचे अपघात होऊ नयेत, म्हणून वेगळे नवनवीन तंत्रज्ञान शोधून काढण्यात आले आहे. त्याचा देखील उपयोग करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.