मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी मोठी खुश खबर आहे. महिला आणि त्यांच्या बाळाचा प्रवास सुखकर होण्यासाठी रेल्वेने अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. रेल्वेने काही गाड्यांच्या बर्थमध्ये प्रायोगिक तत्त्वावर फोल्ड करण्यायोग्य ‘बेबी बर्थ’ बसवला आहे. ‘बेबी बर्थ’वर प्रवाशांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे, अन्य गाड्यांमध्येही ते उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘बेबी बर्थ’ खालच्या बर्थला जोडला जाईल, जो वापरात नसताना खाली दुमडता येईल. ‘बेबी बर्थ’ 770 मिमी लांब आणि 255 मिमी रुंद असेल. तर त्याची जाडी 76.2 मिमी ठेवण्यात आली आहे. सर्वप्रथम लखनऊ मेलमध्ये AC-3 कोचच्या खालच्या सीटमध्ये ‘बेबी बर्थ’ बसवण्यात आला होता.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रायोगिक तत्त्वावर केले गेले आहे आणि प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर त्याचा विस्तार केला जाईल. तसेच आणखी काही गाड्यांमध्ये ते स्थापित केल्यानंतर आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आवश्यक तपशील रेल्वे माहिती प्रणाली केंद्रात ठेवू, जिथे बुकिंगसाठी विनंती केली जाऊ शकते.
आम्ही सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सीट देऊ करत असल्याने बुकिंग व्यवस्था तशीच असेल, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रवाशाने मुलासोबत प्रवास करणार असल्याचे सांगितल्यानंतर आम्ही ही सीट त्याला देऊ. मात्र, ही योजना अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.
दरम्यान, सध्या लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी खालची सीट बुक करण्याची व्यवस्था नाही. या सुविधेचा विस्तार आणि व्यापारीकरण झाल्यानंतर याचा वापर करणाऱ्या महिलांना या सेवेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे सध्या 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पूर्ण भाडे आकारते, पूर्वी ते भाड्याच्या 50 टक्के होते.