इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी याबाबतच्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, डीआरएम भुसावळ विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्री आणि रेल्वे बोर्डाला नियोजन आणि अंमलबजावणीच्या स्थितीची माहिती दिली.
मेळा परिसराची कनेक्टिविटी मजबूत करणे: सिंहस्थसाठी रेल्वे विभाग व्यापक पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल अपग्रेडेशन (परिचालन सुधारणा) हाती घेईल. संपूर्ण प्रदेशातील स्थानकांची क्षमता वाढवण्यासाठी त्यांनी एकात्मिक योजना तयार केली आहे. नाशिक सिंहस्थ २०२७ दरम्यान प्रवासी वाहतूक सुरळीत राहावी, हे याचे उद्दिष्ट आहे.
रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महाकुंभ २०२५ च्या अनुभवातून समोर आलेल्या सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.नाशिकच्या जवळच्या सर्व स्थानकांवर पुरेशा सुविधा विकसित करण्याची सूचना रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली. सुरळीत वाहतुकीसाठी पुरेशा स्टेबलिंग क्षमतेची गरज त्यांनी अधोरेखित केली. मेळा परिसराच्या क्षेत्रातील ५ महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवासी वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी, कसबे सुकेणे या स्थानकांचा समावेश आहे.
पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, प्रवासी सुविधा वाढवणे: रेल्वे अधिकाऱ्यांनी निवडलेल्या पाच स्थानकांवरील प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे आणि प्रवासी सुविधांची माहिती दिली. या स्थानकांवरील नियोजित कामांसाठी १०११ कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.
नाशिक रोड: फलाट-४ हा द्विदिशात्मक असेल. फलाट-1 चा २४ डब्यांच्या गाड्यांसाठी विस्तार केला जाईल. १२ मीटर रुंदीचा एफओबी बांधला जाईल. होल्डिंग एरिया म्हणून गुड्स शेडचा वापर प्रस्तावित आहे.
नाशिकरोड येथे स्टेबलिंग लाईन्स विकसित केल्या जात आहेत. फलाटाचाचा पृष्ठभाग, हद्दीची भिंत आणि मेळा टॉवरचेही अद्ययावतीकरण केले जाईल. अतिरिक्त फलाट बांधले जातील. सहा मीटर रुंदीचे दोन एफओबी बांधले जातील. प्रगत कोच आणि वॅगन तपासणी सुविधा (3 स्टॅबलिंग लाइन आणि 2 पिट लाइनसह) देखील बांधण्याची योजना आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे.
ओढा: येथे लूप लाईन्ससह एक आयलंड फलाट विकसित करण्यात येणार आहे. ६ मीटर रुंदीचे ४ फूट ओव्हर ब्रीज बांधले जातील. लांब पल्ल्याच्या लूप लाईन आणि यार्ड पुनर्रचनेचे कामही प्रस्तावित आहे. ५ स्टेबलिंग लाईन्स बांधण्याचा प्रस्ताव आहे.
खेरवाडी: येथे एक नवीन डाउन फलाट बांधण्यात येणार आहे. दोन ६ मीटर रुंदीचे २ फूट ओव्हर ब्रिज बांधले जातील. यार्ड पुनर्रचनेचे काम देखील हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.
कसबे-सुकेणे: येथे फलाटांचा विस्तार करण्यात येणार आहे. ६ मीटर रुंदीचे २ फूट ओव्हर ब्रिज बांधले जातील. एक सामान्य डिस्पॅच सुविधा उभारण्यात येणार आहे.
वरील कामांव्यतिरिक्त, सर्व ५ स्थानकांवर विविध प्रवासी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. यामध्ये फलाटांवर छत कव्हर, पाण्याच्या टाक्या, नवीन शौचालये आणि वॉटरप्रूफ होल्डिंग एरिया यांचा समावेश आहे. सर्क्युलेटिंग एरिया, मार्ग, प्रवेश/निर्गमन रस्ते आणि प्रवासी माहिती प्रणाली देखील अद्ययावत करण्याचे नियोजन आहे.
रेल्वे विभाग वरील सर्व कामे 2 वर्षांच्या कालावधीत योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. एकूण प्रस्तावित ६५ कामांपैकी ३३ कामांना आधीच मंजुरी देण्यात आली आहे.
सिंहस्थसाठी विशेष गाड्या: सिंहस्थासाठी ३ कोटींहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे, जी २०१५ च्या सिंहस्थाच्या तुलनेत सुमारे ५० पट अधिक आहे. हे लक्षात घेऊन, रेल्वे विभाग विशेष गाड्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवण्याची योजना आखत आहे.
भारतभरातून नाशिककडे येणाऱ्या यात्रेकरूंसाठी लांब पल्ल्याच्या विशेष आणि कमी अंतराच्या मेमू सेवा दिल्या जातील. या गाड्या कामाख्या, हावडा, पटना, दिल्ली, जयपूर, बिकानेर, मुंबई, पुणे, नागपूर आणि नांदेड अशा महत्त्वाच्या स्थानकांना नाशिकशी जोडतील.
एक राउंड-ट्रिप विशेष सर्किट ट्रेन देखील चालवली जाणार आहे. ही गाडी 3 ज्योतिर्लिंगांना – त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर आणि ओंकारेश्वर यांना जोडेल.
गर्दी व्यवस्थापनासाठी उपाययोजना : यात्रेकरूंची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी प्रत्येक प्रमुख स्थानकावर मोठे होल्डिंग क्षेत्र विकसित केले जात आहेत. एक केंद्रीकृत कमांड आणि नियंत्रण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. हे केंद्र प्रभावी देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि अंदाजे वेळापत्रकासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांनी सुसज्ज असेल.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक : रेल्वे अधिकारी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. रेल्वे आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात घनिष्ट समन्वय आहे. येत्या काही महिन्यांत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त प्रगती आढावा बैठक घेतली जाणार आहे.