नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे आगामी कुंभमेळा- २०२७ दरम्यान भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कायमस्वरूपी होल्डिंग एरिया (Permanent Holding Area अर्थात PHA) उभारण्यास मान्यता मिळाली आहे. देशातील एकूण ७३ रेल्वेस्थानकांमध्ये नाशिकचा समावेश करण्यात आल्याने आगामी कुंभमेळ्यात रेल्वे स्थानकात गर्दी व्यवस्थापन करण्यास मोठी मदत होणार आहे.
नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हे जगातील सर्वात मोठा धार्मिक, आध्यात्मिक महोत्सव असून २०२७ मध्ये ५ कोटीहून अधिक भाविक नाशिकमध्ये पवित्र गोदावरीत स्नानासाठी येणार आहेत. तसेच नाशिक रोड हे NSG-2 श्रेणीतील रेल्वेस्थानक असून दररोज १ लाखांहून अधिक प्रवासी येथे येतात. कुंभमेळ्यादरम्यान ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या सण-उत्सव काळात गर्दीच्या नियंत्रणासाठी प्रवाशांना ट्रेन येईपर्यंत स्टेशनबाहेरील प्रतीक्षास्थळांवर थांबवले जात आहे. फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो.
दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्ली स्थानकावर घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ७ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत, गर्दी नियंत्रणासाठी देशातील ६० प्रमुख स्थानकांवर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाची निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी रेल्वेमंत्री यांच्या नाशिक दौऱ्यात, स्थानिक आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने नाशिक रोड स्थानकाचा पुनर्विकास आणि मल्टीमोडल हब तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे मंत्रालयाने नाशिक रोड स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ₹५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये G+20 मजली इमारतीचा समावेश आहे. त्याचबरोबर होल्डिंग एरियाची मंजुरी दिल्यास अतिरिक्त खर्च वाचून रेल्वेच्या सुविधांचा उत्तम वापर होईल अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती.
या अनुषंगाने नाशिक रोड रेल्वेस्थानकावर कायमस्वरूपी होल्डिंग एरियाला मंजुरी देण्यासाठी दि. १७ मार्च २०२५ रोजी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांना मंत्री छगन भुजबळ यांनी पत्र लिहिले होते. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्रालयाकडून कुंभमेळा २०२७ नियोजनाअंतर्गत नाशिक रोड रेल्वेस्थानक येथे Permanent Holding Area (PHA) उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच देशातील ७३ रेल्वे स्टेशन्स मध्ये नाशिकचा समावेश देखील करण्यात आला आहे.
या ७३ स्थानकांवर गर्दी व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्राधान्याने विविध कामे व उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. यामध्ये गर्दीला स्थानकाबाहेरच थांबवण्यासाठी प्रशस्त प्रतीक्षास्थळांची निर्मिती केली जाणार आहे. अनधिकृत प्रवेश बंद, बॅरिकेडिंग करून फक्त आरक्षित तिकिटधारकांनाच थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार आहे. जनरल डब्यांसाठी प्रवाशांचा प्रवाह पुढील व मागील भागांमध्ये सम प्रमाणात विभागणे, १२ मीटर व ६ मीटर रुंदीचे नवीन डिजाईनचे फूटओव्हर ब्रिजेस FOB (रॅम्पसह) निर्माण करणे, संपूर्ण परिसरात CCTV बसवून एकत्रित ‘वार रूम’ मधून देखरेख करणे, संपर्कासाठी वॉकी-टॉकी, घोषणा प्रणाली, कॉलिंग सिस्टीम इ. डिजिटल उपकरणे, अधिकृत रेल्वे व ठेकेदार कर्मचाऱ्यांसाठी RPF च्या मंजुरीनुसार नवीन ओळखपत्रे देणे, आपत्कालीन परिस्थितीत ओळख सुलभ व्हावी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश असणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणाऱ्या या सुविधांमुळे कुंभमेळा काळात गर्दीचे व्यवस्थापन होऊन भाविकांना सुरक्षित व सुलभपणे आपली धार्मिक यात्रा पूर्ण करता येणार आहे.