नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देशाच्या औद्योगिक नकाशांवर नाशिक एक महत्वाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. पारतंत्र्याच्या काळात नाशिक शहरापासून दूर रेल्वेमार्ग आणि नाशिकरोड स्टेशन झाले. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्वाधिक उत्पन्नाचे स्टेशन म्हणून नाशिक ओळखले जाते. ज्या स्तरावर नाशिकरोड स्टेशनचा विकास होणे अपेक्षित आहे तो अद्यापही झालेला नाही. नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित रेल्वे स्टेशन विकास येत्या सिंहस्थापूर्वी होण्याची मोठी गरज आहे. या दृष्टीने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र चेंबरचे पदाधिकारी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले. खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेऊन रेल्वेच्या मागण्यांचे पत्र देऊन चर्चा केली असल्याचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी सांगितले.
नव्या रेल्वे गरज – नाशिक ते पुणे हा रेल्वेमार्ग आणि तशी स्वतंत्र गाडी हि मागणी रास्त असून ती होण्यासाठी मोठा कालावधी लागेल. तत्पूर्वी ज्या प्रकारे रेल्वेने काही वर्षांपूर्वी मनमाड ते पुणे व्हाया नाशिक कल्याण अशी गाडी चालविली होती. या गाडीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अशी स्वतंत्र गाडी देणे शक्य नसेल तर गोवा एक्सप्रेस, नांदेड पुणे एक्सप्रेस, अमरावती पुणे एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस या गाड्या मनमाड नाशिक कल्याण पुणे अशाप्रकारे चालवल्या जाऊ शकतात. किमान पक्षी नांदेड पुणे एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस , पुणे अमरावती एक्सप्रेस अशा दोन तीन गाड्या तरी नक्कीच या मार्गाने तातडीने वळवता येतील .
यात अंतर हे सध्यातील मार्गा पेक्षा ३८ किमी ने वाढणार असले तरीही मनमाड दौंड या एकेरी मार्गावर लागणाऱ्या प्रवास वेळे पेक्षा कमी कालावधी मध्ये भुसावळ कल्याण तिसरी लाईन पूर्ण होत असल्याने पुणे येथे पोहचणार आहे, या व्यतिरिक्त कल्याण-पुणे विभागातील कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी पुश पूल इंजिन कॉन्फिगरेशनचा विचार करण्याची मागणी केली. संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी, गोवा, मराठवाडा आणि कोकण-गोवा यांच्यात थेट कनेक्टिव्हिटीची मागणी आहे. सध्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईमार्गे प्रवास करावा लागत असून प्रवासासाठी १८ ते २० तास लागतात. सध्याच्या मार्गाच्या वेळेनुसार संभाजीनगर येथून १८.३० वाजता सुटणारी, २१. १५ वाजता नाशिकला पोहोचणारी, कल्याण आणि पनवेल येथे थांबा असलेली, रत्नागिरीला ६ वाजता आणि मडगाव (गोवा) ९.३० वाजता पोचणारी ट्रेन सुरू करण्यात यावी.
शिर्डी-गुजरात (अहमदाबाद मार्गे मनमाड-नाशिक–वसइ रोड-सुरत) शिर्डीचे आध्यात्मिक आणि आर्थिक महत्व लक्षात घेऊन, शिर्डीला गुजरातशी जोडणारी रेल्वे सुरु करावी. त्यासाठी प्रस्तावित वेळापत्रक शिर्डी येथून १८. वाजता प्रस्थान आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता अहमदाबाद येथे आगमन, मनमाड, नाशिक कल्याण, वसईरोड आणि सुरत मार्गे असे असावे. अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे. यासंदर्भांमध्ये नाशिक जिल्ह्यातील व विभागातील सर्व लोकप्रतिनिधींनी रेल्वेविषयक सुविधा होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे.