नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतर्गत, केंद्रीय दूरसंचार विभागाने रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मोबाइल फोनच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे सुरक्षा दलासोबत भागीदारी केली आहे.
या भागीदारीअंतर्गत दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे प्रवाशांचे हरवलेले /चोरीला गेलेले मोबाइल फोन शोधून ते पुन्हा मिळवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतील. यादृष्टीने रेल मदत (Rail Madad) हे अॅप आता दूरसंचार विभागाच्या संचार सारथी (Sanchar Saathi) या व्यासपीठासोबत जोडले गेले आहे.
दूरसंचार विभागाच्या संचार सारथी या व्यासपीठाअंतर्गत तक्रार केलेले चोरीला गेलेले/हरवलेले मोबाइल फोन ब्लॉक अर्थात वापरासाठी प्रतिबंधित करण्याची सुविधा उपलब्ध आहे, तर रेल मदत अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान असलेल्या तक्रारी किंवा समस्यांचे निराकरण करून घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता या दिशेने काम करताना संचार सारथी पोर्टलवर रेल्वे सुरक्षा दलाची 17 क्षेत्र आणि 70+ विभागांना जोडून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता प्रवासी रेल मदत अॅप वर हरवलेल्या /चोरी गेलेल्या मोबाइल फोन उपकरणांबाबत तक्रार नोंदवू शकतील. या तक्रारीचे तपशील संचार सारथी पोर्टलवर पाठवले जातील, यामुळे हरवलेली/चोरी गेलेली मोबाइल फोन उपकरणे ब्लॉक करून त्याचा गैरवापर रोखण्यात मदत होणार आहे. याशिवाय या मोबाईल उपकरणांचा मागोवा घेणे आणि त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाला त्याबाबतची सूचना जारी करणे शक्य होईल.
याव्यतिरिक्त, दूरसंचार विभाग नागरिकांना संचार सारथीच्या CEIR मॉड्यूलचा वापर करून हरवलेले/चोरीला गेलेल्या मोबाइल फोनची तक्रार नोंदवण्याचे आवाहन करत आहे. यामुळे दूरसंचार सेवा अधिक सुरक्षित आणि वापरकर्त्यांना अनुकूल बनवण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्नांना चालना मिळू शकणार आहे. ग्राहक हितांचे रक्षण करण्यासाठी दूरसंचार विभाग कठोर देखरेख आणि तातडीच्या कारवाईसाठी वचनबद्ध असल्याचेही विभागाने म्हटले आहे.
नागरिकांनी संचार सारथी अॅपचा वापर करून सायबर गुन्हे आणि सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दूरसंचार संसाधनांच्या गैरवापर होत असल्याबाबतच्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही दूरसंचार विभागाने केले आहे.
अॅप डाउनलोड करण्यासाठी दुवे:
Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.dot.app.sancharsaathi
iOS: https://apps.apple.com/app/sanchar-saathi/id6739700695