इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत रेल्वे मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेदरम्यान भारतीय रेल्वेची कामगिरी आणि भविष्यातील योजनांचा उल्लेख केला. भारतीय रेल्वे प्रवाशांना केवळ परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि दर्जेदार सेवा प्रदान करत नाही तर जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण करत आहे, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका यासारख्या शेजारी देशांच्या तुलनेत भारतात रेल्वे प्रवास भाडे कमी आहे, तर पाश्चात्य देशांमध्ये रेल्वे प्रवास भाडे भारतापेक्षा 10 ते 20 पट जास्त आहे असेही ते म्हणाले.
रेल्वे प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीबाबत, रेल्वे मंत्री म्हणाले की, सध्या, रेल्वे प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये इतका आहे, परंतु प्रवाशांना मात्र फक्त 73 पैसे आकारले जातात, म्हणजेच 47% सवलत दिली जाते, अशी माहिती त्यांनी दिली. 2022-23 या आर्थिक वर्षात प्रवाशांना 57,000 कोटी रुपयांची सवलत देण्यात आली होती, 2023-24 मध्ये ती वाढून अंदाजे 60,000 कोटी रुपयांपर्यंत (तात्पुरते आकडे) पोहोचली आहे, असे ते म्हणाले. कमीत कमी भाड्यात सुरक्षित आणि चांगल्या सेवा प्रदान करणे हे रेल्वेचे ध्येय आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
रेल्वे विद्युतीकरणाचे फायदे अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, प्रवाशांची संख्या आणि मालवाहतुकीत वाढ झाली असली तरी, ऊर्जा खर्च स्थिर राहिला आहे. भारतीय रेल्वे 2025 पर्यंत ‘स्कोप 1 निव्वळ शून्य’ आणि 2030 पर्यंत ‘स्कोप 2 निव्वळ शून्य’ साध्य करण्याच्या ध्येयावर काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले.
या वर्षी भारतात 1,400 इंजिनांची निर्मिती झाली आहे, जी अमेरिका आणि युरोपच्या संयुक्त उत्पादनापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर, रेल्वे ताफ्यात 2 लाख नवीन वॅगन समाविष्ट करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की, 31 मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वे 1.6 अब्ज टन मालवाहतूक करून भारत हा चीन आणि अमेरिकेसह जगातील शीर्ष तीन देशांपैकी एक बनेल.
रेल्वे सुरक्षेबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 41,000 एलएचबी डबे तयार करण्यात आले आहेत, आणि सर्व आयसीएफ डब्यांचे एलएचबी डब्यांमध्ये रूपांतर केले जाईल. लांब रेल्वे रुळ, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, फॉग सेफ्टी उपकरणे आणि ‘कवच’ प्रणाली जलद गतीने कार्यान्वित केली जात आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अलीकडील अपघाताबाबत, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सभागृहाला माहिती दिली की या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व डेटा सुरक्षित ठेवण्यात आला असून, सुमारे 300 लोकांशी चर्चा करून तथ्यांची तपासणी केली जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या जात आहेत.
त्याचबरोबर, त्यांनी स्पष्ट केले की भारतीय रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ती आणखी सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांची संख्या वाढत आहे आणि मालवाहतूकही वाढत आहे. सध्या रेल्वेचे उत्पन्न सुमारे 2.78 लाख कोटी रुपये असून, खर्च 2.75 लाख कोटी रुपये आहे. भारतीय रेल्वे आपल्या सर्व मोठ्या खर्चांची पूर्तता स्वतःच्या उत्पन्नातून करत आहे, हे केवळ रेल्वेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शक्य झाले आहे.
राज्यसभेतील भाषणाचा समारोप करताना वैष्णव यांनी आश्वासन दिले की, भारतीय रेल्वे भविष्यात अधिक आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली म्हणून उदयास येईल.