नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनच्या सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत रामाभूमीतून म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील निवड करण्यात आलेले ८०० जेष्ठ नागरिक १८ मार्च २०२५ मंगळवार रोजी सकाळी १२ वाजता अयोध्या धाम येथे प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी रवाना होणार आहेत. संपूर्ण यात्रेचे नियोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक कार्यालयाने केले आहे.
नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवर ही विशेष रेल्वे उभी करण्यात येणार आहे. ज्यांची निवड करण्यात आली आहे त्या सर्व लाभार्थ्याना समाज कल्याण विभागाकडून संपर्क साधण्यात आला असून त्या सर्व लाभार्थी/ जेष्ठ नागरिकांनी सकाळी १० वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर उपस्थित राहावे, असे आवाहन देविदास नांदगावकर, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नाशिक यांनी केले आहे.
या विशेष रेल्वेला संपूर्ण फुलांनी सजविण्यात येणार असून मान्यवरांचे उपस्थितीत हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. व त्यानंतर ही रेल्वेगाडी अयोध्या धामकडे रवाना होणार आहे. समाज कल्याण विभागाने भाविकांसाठी विशेष काळजी घेतली आहे. यात्रेकरूंना कुठलीही अडचण येऊ नये, याची खबरदारी म्हणून २० कर्मचारी व डॉक्टरांची टिम वैद्यकीय पथक औषध-गोळ्यासह यात्रेकरूंसोबत पाठविण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आले आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना खाण्या-पिण्याची व आयोध्या येथे निवासाची व्यवस्था देखील करण्यात येत आहे.१८ ते २२ मार्च असा आयोध्या प्रवास असेल २२ रोजी पहाटे सदर विशेष रेल्वे गाडी ही नाशिकला परतणार आहे.
सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या ८०० जेष्ठ नागरिकाना मोफत तीर्थ दर्शनचा लाभ मिळत असल्याने जेष्ठ नागरिक यात्रेकरूंनी समाधान व्यक्त केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे गोरगरिब, वयोवृध्द नागरिक तीर्थस्थळांना जाऊ शकत नाहीत, त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली. ज्या अर्जादांरानी या योजनेसाठी अर्ज सादर केले होते, त्यांची निवड होऊन त्या नागरिकाना आता प्रत्यक्ष या योजना लाभ देणे सुरु झाले आहे.
ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येत आहे. भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. देशातील व राज्यातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मनशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयां मधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.