इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्व स्तरातील सरकारी कर्मचारी आता रजा प्रवास सवलत (एलटीसी ) चा वापर करत अत्याधुनिक वंदे भारत, तेजस आणि हमसफर एक्स्प्रेसमधून जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील. केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने विविध विभागांकडून आलेल्या अनेक विनंत्यांनंतर या जागतिक दर्जाच्या गाड्यांमधून मूळ गावी तसेच भारतात कुठेही एलटीसी वापरून रेल्वे प्रवास करण्याला परवानगी दिली.
सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आलिशान प्रवास
या निर्णयामुळे, केंद्र सरकारचे सर्व कर्मचारी आता त्यांच्या रजा प्रवास सवलतीचा (एलटीसी ) वापर करताना 241 अतिरिक्त गाड्यांच्या सेवांद्वारे प्रवास करू शकतात. ते आता 136 वंदे भारत, 97 हमसफर आणि 8 तेजस एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करू शकतात. सरकारी कर्मचारी याआधी राजधानी, शताब्दी आणि दुरांतो श्रेणीतील विद्यमान 144 प्रीमिअर गाड्यांमधून आलिशान वातानुकूलित प्रवासाचा लाभ घेत होते. आता या निर्णयामुळे, देशातील सर्व प्रदेशांमध्ये धावणाऱ्या एकूण 385 गाड्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना एलटीसी प्रवासासाठी तिकिटे आरक्षित करता येतील.
वंदे भारत, तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेस गाड्यांमधून कमी आणि मध्यम अंतराच्या रेल्वे प्रवासात कर्मचारी 11 व्या लेव्हलपर्यंत चेअर कारच्या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. लेव्हल 12 आणि त्यापुढील कर्मचारी या गाड्यांमधून एक्झिक्युटिव्ह चेअर कार प्रवास करण्यास पात्र आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी, जेथे कोचमध्ये बर्थ आहेत म्हणजेच राजधानी सारख्या आलिशान गाड्या , 12 आणि त्यापुढील लेव्हलवरील कर्मचारी एसी द्वितीय श्रेणीच्या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात. लेव्हल 6 ते 11 पर्यंत, कर्मचारी एसी द्वितीय श्रेणीच्या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात तर इतर सर्व म्हणजे 5 आणि त्याखालील लेव्हल मधील लोक त्यांच्या एलटीसी साठी एसी तृतीय श्रेणीच्या प्रवासाचा लाभ घेऊ शकतात.
एलटीसी : सरकारी कर्मचाऱ्यांना भारत भ्रमन्तीसाठी सवलतीच्या दरात प्रवास
एलटीसी (लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन) ही सरकारी कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेली सवलतीची प्रवास सुविधा आहे, जी त्यांना त्यांच्या मूळ गावी किंवा भारतातील कोणत्याही ठिकाणी चार वर्षांतून एकदा भेट देण्याची परवानगी देते. कर्मचारी प्रत्येक दोन वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा मूळगावी जाण्यासाठी एलटीसी वापरू शकतात किंवा ते एकदा त्यांच्या गावी भेट देण्यासाठी आणि चार वर्षांच्या ब्लॉकमध्ये एकदा भारतातील कोणत्याही ठिकाणी भेट देण्यासाठी एलटीसी वापरू शकतात.