इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे आणि नाशिक मधील रेल्वे संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने 248 किलोमीटर लांबीच्या दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. एकूण 248 किलोमीटरपैकी 178 किलोमीटरचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे, तर उर्वरित भागाचे काम हाती घेण्यात आले आहे. याशिवाय नाशिक-साईनगर शिर्डी (82 किमी), पुणे-अहमदनगर (125 किमी) दरम्यान नवीन दुहेरी मार्ग आणि साईनगर शिर्डी-पुणतांबा (17 किमी) दरम्यान नवीन दुहेरी मार्गासाठी तीन रेल्वे प्रकल्पांच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
पुणे आणि नाशिक दरम्यान थेट संपर्कासाठी महाराष्ट्र सरकारची संयुक्त उपक्रम कंपनी (50%) महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमआरआयडीसी) आणि रेल्वे मंत्रालयाने (50%) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे, अशी माहिती वैष्णव यांनी दिली.
डीपीआरमधील प्रस्तावित संरेखन नारायणगावमधून जात होते, ज्या ठिकाणी नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए), पुणे यांनी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वेधशाळा स्थापन केली आहे. जीएमआरटी चे एकतीस देशांमधील (28 व्या आवर्तनापर्यंत) वापरकर्ते असून, ते वैज्ञानिक निरीक्षणांसाठी त्याच्या सेवांचा वापर करतात. जीएमआरटी वेधशाळेच्या कामकाजावर प्रस्तावित रेल्वे मार्गाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, हे संरेखन स्वीकारार्ह ठरले नाही.
याची नोंद घ्यावी, की पुणे आणि नाशिक यापूर्वीच पुणे – कल्याण – नाशिक (265 किमी) आणि पुणे – दौंड – अहमदनगर – मनमाड – नाशिक (387 किमी) मार्गे रेल्वे नेटवर्कशी जोडले गेले आहे.
रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देणे ही भारतीय रेल्वेची निरंतर आणि गतिशील प्रक्रिया आहे. रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प हे चालू प्रकल्पांचा खर्च, निधीची एकूण उपलब्धता आणि मागणी यावर भर देत, महसूल निर्मितीची क्षमता, वाहतुकीचा अंदाज, कानाकोपऱ्या पर्यंत कनेक्टिव्हिटी, निसटलेले दुवे आणि पर्यायी मार्ग, अत्याधिक गर्दीच्या मार्गांचा सामाजिक-आर्थिक दृष्ट्या विचार ई. च्या आधारे हाती घेतले जातात.