नवी दिल्ली – गणपती उत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, भारतीय रेल्वे २६१ गणपती विशेष गाड्या विविध ठिकाणांसाठी चालवणार आहे. या गाड्यांसाठी विशेष तिकीट भाडे असणार आहे. गणपती विशेष गाड्यांमध्ये मध्य रेल्वे २०१, पश्चिम रेल्वे ४२, कोकण रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) १८ गाड्या चालवणार आहे. या गाड्यांची सेवा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाली असून त्या २० सप्टेंबर पर्यंत धावतील. तसेच, गर्दी कमी करण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या विविध गाड्यांमध्ये स्लीपर क्लासचे डबे वाढवले जाणार आहेत.
वेळ आणि थांब्यांविषयी सविस्तर माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी असेल याची कृपया नोंद घ्यावी. प्रवाशांनी कृपया आरंभ स्थानापासून प्रवासादरम्यान तसेच गंतव्य स्थानावर कोविड -19 शी संबंधित सर्व नियमांचे, मानक नियमावलीचे पालन करावे.