नाशिकरोड : नातेवाईकांची वाट बघत उभ्या असलेल्या प्रवासी तरूणास दोघांनी बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना रेल्वे स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोघा संशयीतांना अटक केली आहे. संजय त्र्यंबक खांडगीर (२९ मुळ रा.अकोले,नगर हल्ली सिन्नर) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. खांडगीर शुक्रवारी (दि.३) कामानिमित्त इगतपुरी येथे गेला होता. दुपारच्या सुमारास तो रेल्वेने नाशिकरोड येथे आला असता ही घटना घडली. रेल्वेस्टेशन आवारात तो नातेवाईकाची वाट बघत असतांना दोघांनी त्यास गाठले. यावेळी संशयीतांनी नाव गाव विचारत त्यास बोलत बोलत नालंदा लॉज पाठीमागे घेवून गेले. या ठिकाणी दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवित लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत कानाजवळ आणि पायास दुखापत करून त्यास चाकूचा धाक दाखवून भामट्यांनी त्याच्या खिशातील सातशे रूपयांची रोकड, मोबाईल आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४८ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून पोबारा केला होता. पोलीसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक युनूस शेख करीत आहेत.