नवी दिल्ली – आधुनिक सुविधेने सुसज्ज दिव्यांगांसाठी बनविण्यात आलेल्या वातानुकूलित ३ टियर (इकॉनॉमी एस ३) ही नव्या श्रेणी सुरूवात करण्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे. विविध रुपात वातानुकूलित ३ टियरचे ५० डबे देण्यात आले आहेत. त्यासोबतच त्याचे भाडेही ठरविण्यात आले आहे. सामान्य श्रेणीच्या वातानुकूलित ३ टियरपेक्षा याचे भाडे आठ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.
रेल्वे मंडळाचे अधिकारी सांगतात, देशभरात धावणा-या मेल-एक्स्प्रेस आणि अतिजलद रेल्वेमध्ये इकॉनॉमी -३ डबे लावले जातील. हे डबे शयनयान डब्यांच्या जागी लावले जातील. रेल्वेमध्ये शयनयान बोगी घटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बोगीत लहान मुलांचे भाडे, सर्व प्रकारच्या सवलती, तिकीट रद्द करणे किंवा पैसे परत मिळण्याचे नियम सामान्य वातानुकूलित ३ टियरसारखेच लागू होतील.
प्रयागराज-जयपूर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ०२४०३) मध्ये वातानुकूलित-३ ची बुकिंग शनिवारपासून सुरू झाली. विविध भागात आतापर्यंत ५० इकॉनॉमी एसी ३ बोगी पाठविण्यात आल्या आहेत. इकॉनॉमी एसी ३ मध्ये ८३ शयनयान सीट आहेत. तर सामान्य एसी ३ मध्ये ७२ सीट असतात. म्हणजेच ११ अतिरिक्त सीट आहेत. त्यानुसार रेल्वे विभागाने इकॉनॉमी एसी ३ चे भाडे आठ टक्क्यांनी कमी केले आहेत.
या बोगींना दिव्यांगासाठी विशेष रुपाने तयार करण्यात आले आहे. मोबाईल फोन चार्जिंगसह मॅग्निज होल्डर्स, अग्निसुरक्षा यंत्रणा या सारख्या अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. वरच्या बर्थवर चढण्यासाठी आरामदायी शिडी तयार करण्यात आली आहे. ३०० किमीपर्यंतचे प्रवासी भाडे ४४० रुपये असतील. अंतराच्या तुलनेने हे भाडे खूपच कमी आहे. ४,९५१ पासून ५ हजार किमीसाठी जास्तीत जास्त ३,०६५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. या आर्थिक वर्षापर्यंत ८०६ नवे डबे तयार केले जाणार आहेत.