नवी दिल्ली – देशातील पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस शनिवार-रविवारी तीन फे-यांमध्ये एक ते अडीच तास उशिराने धावली. त्यामुळे आयआरसीटीसीला पहिल्यांदाच सर्वाधिक २०३५ प्रवाशांना जवळपास चाडेचार लाख रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. शनिवारी मुसळधार पावसामुळे नवी दिल्ली स्थानकावर तेजस अडीच तास उशिरा पोहोचली. परतीच्या प्रवासातही रेल्वे लखनऊकडे उशिरा निघाली. रविवारीसुद्धा लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेसला एक तास उशीर झाला होता.
रेल्वेला उशीर झाल्यास प्रवाशांना भरपाई देणारी तेजस एक्स्प्रेस पहिली रेल्वे आहे. एक तास उशीर झाल्यास १०० रुपये आणि दोन तास उशीर झाल्यास २५० रुपये भरपाई मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. शनिवारी उशीर झाल्याच्या बदल्यात १५७४ प्रवाशांना प्रतिव्यक्ती २५० रुपयांच्या हिशेबानुसार एकूण तीन लाख ९३ हजार ५०० रुपये भरपाई दिली जाणार आहे. तर रविवारी पहिल्या फेरीच्या ५६१ प्रवाशांना एका तासाच्या विलंबासाठी शंभर रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे ५६,१०० रुपये भरपाई दिली जाणार आहे. अशा प्रकारे एकूण २१३५ प्रवाशांना ४,४९६०० रुपये भरपाई दिली जाणार असल्याचे आयआरसीटीसीचे मुख्य क्षेत्रिय व्यवस्थापक अजित सिन्हा यांनी सांगितले.
दिल्लीत स्वयंचलित सिग्नल नादुरुस्त
आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, लखनऊहून दिल्लीला जाणारी तेजस एक्स्प्रेस शनिवारी लखनऊ जंक्शनवरून नियोजित वेळेनुसार सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी रवाना झाली. मुसळधार पावसामुळे नवी दिल्ली स्थानकाच्या यार्डात पाणी घुसल्याने स्वयंचलित सिग्नल नादुरुस्त झाले. त्यामुळे रेल्वे जिथे आहे तिथेच थांबून राहिली. त्यामुळे तेजस नवी दिल्ली स्थानकावर १२.२५ या नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने पोहोचली. लखनऊला जाणारी तेजस ३.४० या नियोजित वेळेपेक्षा अडीच तासांनी उशिराने सुटली.
दोन वर्षात प्रथमच मोठा भुर्दंड
विमानासारख्या सुविधा पुरविणारी तेजस एक्स्प्रेस ४ ऑगस्ट २०१९ रोजी पहिल्यांदा लखनऊ-दिल्ली असी धावली होती. रेल्वेला एका तासाहून कमी विलंबासाठी आतापर्यंत पाचवेळा तक्रारी आलेल्या आहेत. रेल्वे ९९.९ टक्के नियोजित वेळेत धावली आहे, असा दावा आयआरसीटीसीने केला आहे. दोन वर्षात पहिल्यांदाच आयआरसीटीसीला इतक्या मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी लागणार आहे. थंडीच्या दिवसात दाट धुक्यामुळे एकदा तेजसला दोन तास उशीर झाला होता. तेव्हा दीड हजारांहून अधिक प्रवाशांना भरपाई द्यावी लागली होती. प्रवास समाप्त झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल, ईमेलवर क्लेमचा मेसेज मिळेल, असे आयआससीटीसीचे मुख्य क्षेत्रिय व्यवस्थापक अजित सिन्हा यांनी सांगितले.