नवी दिल्ली – भारतीय रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस आपला पुढचा प्रवास बांगलादेशात करण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्सप्रेसची परदेशातील मोहीम ठरणार आहे. आजच, या संदर्भातील दक्षिण पूर्व रेल्वे विभागाअंतर्गत २०० मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी चक्रधरपूर इथल्या टाटा कार्यालयात करण्यात आली आहे. हा ऑक्सिजन बांगलादेशातील बेनापोल येथे जाणार आहे. हा २०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भरण्याचे काम आज सकाळी ९.२५ वाजता पूर्ण करण्यात आले. भारतीय रेल्वेने देशभरातील राज्यांमध्ये असलेल्या कोविड रुग्णांना लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा व्हावा, या उद्देशाने २४ एप्रिल पासून ही ऑक्सिजन एक्सप्रेस सुरु केली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंत ३५००० मेट्रिक टनपेक्षा अधिक द्रवरूप ऑक्सिजन १५ राज्यांत पोचवण्यात आला आहे. यासाठी ४८० ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्यात आल्या. गरजेच्या ठिकाणी लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.