विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे नेटवर्कमुळे रेल्वे खात्याचा व्यावसायिक दृष्टीकोनातून विकास करण्याची एक महत्त्वाची जबाबदारी नवीन रेल्वे मंत्र्यांवर आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारताच मोठा बदल जाहीर केला आहे. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकारी आता दोन शिफ्टमध्ये काम करतील. सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळेत पहिली शिफ्ट आणि दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत दुसरी शिफ्ट असेल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
वैष्णव म्हणाले की, रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्रालयातील सर्व कर्मचारी तातडीने प्रभावीपणे दोन शिफ्टमध्ये काम करतील. पहिली पाळी सकाळी ७ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ४ पर्यंत सुरू राहिल. तर दुसरी पाळी दुपारी ३ वाजेपासून सुरू होईल आणि रात्री १२ वाजेपर्यंत चालेल. या आदेशानुसार केवळ सरकारी कर्मचारी काम करतील, असे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. रेल्वेशी संबंधीत अन्य खासगी कर्मचारी पूर्वीप्रमाणेच काम करतील.
वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना बजावले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनातून रेल्वे हा महत्त्वाचा भाग असून लोकांचे जीवन रेल्वेमार्गाने बदलावे लागेल, जेणेकरून सामान्य माणूस, शेतकरी, गरीब लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच रेल्वेमंत्री वैष्णव यांच्यासमोर बुलेट ट्रेनसह हायस्पीड रेल्वे कॉरिडोर जलद मार्गावर आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे प्रशासकीय सुधारणांसह पुन्हा रेल्वेला गती देण्याविषयी त्यांचा विचार आहे. ओडिशाचे भाजप खासदार अश्विनी वैष्णव यांनी आयएएस अधिकारी असताना अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या.