इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि (डीआरडीओ) आणि सामरीक बल कमांड (स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड ,एसएफसी) यांच्या संयुक्त सहकार्याने २४ सप्टेंबर रोजी पूर्णतः कार्यरत असलेल्या रेल्वे आधारित मोबाइल लाँचर सिस्टममधून मध्यम श्रेणीच्या (इंटरमीडिएट रेंज) अग्नि-प्राइम या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले.हे अत्याधुनिक पद्धतीचे क्षेपणास्त्र २००० किमी पर्यंतचा पल्ला व्यापण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि विविध प्रगत सुविधांनी सुसज्ज आहे.
विशेषप्रकारे डिझाइन केलेल्या अशाप्रकारच्या या पहिल्याच क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण रेल्वे आधारित मोबाईल लाँचरवरून करण्यात आले, ज्यामध्ये कोणत्याही पूर्वअटीशिवाय रेल्वेच्या नेटवर्कवर जाण्याची क्षमता आहे. हे देशभरात सर्वत्र (क्रॉस कंट्री) मोबिलिटी प्रदान करते आणि कमी दृश्यमानतेसह कमी प्रतिक्रिया वेळेत प्रक्षेपित करण्याची क्षमता यामध्ये आहे. हे स्वयंपूर्ण आहे आणि अत्याधुनिक संप्रेषण प्रणाली आणि संरक्षण यंत्रणेसह सर्व स्वतंत्र प्रक्षेपण क्षमता वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.
या क्षेपणास्त्राच्या मार्गाचा मागोवा विविध ग्राउंड स्टेशन्सद्वारे घेण्यात आला आणि हे एक आदर्श प्रकारचे प्रक्षेपण होते ज्याने मोहिमेच्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता केली आहे.या यशस्वी प्रक्षेपणामुळे भविष्यातील रेल्वे आधारित प्रणालींना सेवांमध्ये समाविष्ट करणे शक्य होईल. डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडचे अधिकारी या प्रक्षेपणाच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते.
यशस्वी उड्डाण चाचण्यांच्या मालिकांनंतर रस्ते मार्ग मोबाईल अग्नि-पी या अगोदरच सेवेत दाखल करण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मध्यम श्रेणीतील (इंटरमीडिएट रेंज) अग्नि-प्राइम या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, एसएफसी आणि सशस्त्र दलांचे अभिनंदन केले आहे.’या उड्डाण चाचणीमुळे भारत रेल्वे नेटवर्कमधून कॅनिस्टराइज्ड लाँच सिस्टम विकसित करणाऱ्या निवडक राष्ट्रांच्या गटात सामील झाला आहे’,असे ते यावेळी म्हणाले
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष यांनी समूहातील सर्व सहभागींची या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा केली आहे.