मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावर्षी साजरा करण्यात येणारा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे 2 जून तर तारखेप्रमाणे 6 जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे आयोजन आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे शिवराज्याभिषेक सोहळा पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आढावा घेताना मंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार भरत गोगावले, रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष राजे संभाजी छत्रपती उपस्थित होते, तर सभागृहात सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे-पाटील, चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, सांस्कृतिक कार्यचे संचालक बी. एम चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष सुनील पवार आदी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका सर्व लोकप्रतिनिधींना देण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सोहळ्याचे निमंत्रण प्रत्येक मान्यवरांना द्यावे. निमंत्रण पत्रिकेवर सर्व कार्यक्रमांची माहिती असावी. त्याचा क्युआर कोड असावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित वारस, घराणे यांना वैयक्तिक स्तरावर निमंत्रण द्यावे. रायगडावर सोहळ्यावेळी पाण्याची, स्वच्छतेची व्यवस्था व गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी. गडावर माहितीसाठी फलकांची व्यवस्था करावी. सोहळ्यादरम्यान 1 ते 6 जून पर्यंत आयोजित होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची माहिती एकत्रितरित्या रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावी. तसेच शिवराज्याभिषेक कार्यक्रमावर आधारित डाक तिकिट अनावरणाची तयारी करावी.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रायगड हे ऊर्जाकेंद्र आहे. त्यामुळे येथील कार्यक्रम दिमाखदार व ऐतिहासिक झाला पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग करून उपाययोजना कराव्या. पार्किंगस्थळ येथून गडाच्या पायथ्यापर्यंत राज्य परिवहन बसेसची व्यवस्था करावी. बसेसचे मागील काळात थकीत असलेली रक्कम देण्याची कार्यवाही करावी. गडावर इंटरनेटची सुविधा करावी. जेणेकरून जगभर सोहळा थेट प्रक्षेपण करून दाखविता येईल. बैठकीला शिवराज्याभिषेक समितीचे पदाधिकारी, राजगड जिल्हा प्रशासनातील अधिकारी, सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Raigarh Shivrajyabhishek sohala Celebration