अलिबाग (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडली. वसाहतीवर दरड कोसळल्याने रात्रीच्या झोपेतच अनेक जण कायमचे झोपी गेले. या दुर्घटनेत सुमारे २७ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण अद्यापही बेपत्ता आहेत. काही जणांची सुटका झाली आहे. आता या दुर्घटनेला १० दिवस झाल्याने यातील मृतांचा दशक्रिया विधी पार पडला. अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने आई-वडीलांचा दशक्रिया विधी केला. हदयद्रावक म्हणजे, तीन चिमुकल्या पोरक्या झाल्या आहेत. आई-वडिल या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले. आता दोन्ही लहान बहिणींचा सांभाळ करणार असल्याचे १२ वर्षांच्या राधिकाने म्हटले आहे. तिचे हे वाक्य ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाले.
अनेकांना दाटून आला हुंदका
इर्शाळवाडी हे ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात स्थित असून, सदर ठिकाणी वाहने जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसून, मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागते. घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी तसेच अद्यापही काही प्रमाणात भूस्खलन होत आहे. तथापि एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य अविरहीतपणे सुरु होते. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अशा परिस्थितीत या घटनेला दहा दिवस उलटले आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची आज सामूहिक दशक्रिया विधी पार पडला. इर्शाळवाडी जवळ असलेल्या नाणेवाडी गावात दशक्रिया विधी पार पडला मात्र येथील दृश्य कोणाचेही मन हेलावणारे असे होते. अवघ्या १२ वर्षाच्या राधिका नावाच्या मुलीने आई-वडीलांचा दशक्रिया विधी केला. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
मामाकडे जाणार
घरातील मोठी माणसे किंवा करते सवरते लोक जातात, तेव्हा लहानग्या जीवांचे काय होत असेल? याचा विचारही करणे अवघड होते. ती लेकरे अनाथ आणि पोरकी होतात, परंतु अशा कठीण परिस्थिती ही देखील त्यांना तोंड देत जीवन जगावे लागते हेच खरे. सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या राधिकाला दोन लहान बहिणी आहेत. या तिन्ही मुली आता पोरक्या झाल्या आहेत. राधिकाच्या एका बहिणीचे वय १० वर्ष तर दुसरीचे साडेतीन वर्ष आहे. राधिकाने दोन्ही बहिणीचा सांभाळ करणार असल्याचे सांगितले. सोनू आणि माधूरी असे राधिकेच्या बहिणीचे नाव आहे. घटना घडली तेव्हा राधिका मामाकडे होते. इर्शाळवाडीत शाळा नसल्यामुळे ती मामाकडे शिकायचे. आता मामाकडे जाणार असल्याचे राधिकाने सांगितले. राधिकाचे मामा माथेरान येथे राहतात. आता या तिघा बहिणींना मामाचा काय तो आधार आहे, असे म्हटले जाते.