मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायगड जिल्ह्यातील दरडप्रवण गावे, पूरप्रवण गावांमध्ये उद्भवणाऱ्या आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी १०३२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
रायगड जिल्ह्यातील ३५५ गावांना पावसाळ्यात पूर व दरडी कोसळण्याचा धोका असल्याबाबत सदस्य प्रसाद लाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील बोलत होते. मंत्री श्री.पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात वरिष्ठ भू-वैज्ञानिक तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार डोंगरमाथ्यावर व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या १०३ गावांना दरडीपासून धोका लक्षात घेता यामधील ९ अती धोकेदायक, ११ मध्यम स्वरूप धोकेदायक आणि ८३ कमी धोकादायक, अशी गावे आहेत. यामधील दरडप्रवण गावे, पूर प्रवण गावे, या ठिकाणी आपत्कालीन बाब उद्भवल्यास तात्पुरत्या स्थलांतरासाठी शाळा, समाजमंदिरे इ. ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
आपत्तीस तत्काळ प्रतिसाद देण्याकामी गावनिहाय तलाठी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, कोतवाल, पोलीसपाटील, आपदा मित्र, सखी, स्थानिक स्वयंसेवी संस्थामधील सदस्य मिळून पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच कोणत्याही आपत्तीस तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये २४x७ तास तालुका नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प राबविण्यासाठी १०३२ कोटी रुपयांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
raigad district landslide prone villages survey report
GSDA Maharashtra Government Natural Disaster