इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुलडाणाः काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना फोन केल्याची माहिती आहे. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीसोबत महाविकास आघाडीची युती झाली नसल्यामुळे काँग्रेस आणि ‘वंचित’ मध्ये दुरावा वाढला होता; मात्र तरी आंबेडकर यांनी काँग्रेसच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिला होता. आता राहुल यांनीच फोन केल्यामुळे काँग्रेस आणि ‘वंचित’ मधील कटुता काही प्रमाणात कमी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची अँजिओप्लॅस्टी शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेनंतर आंबेडकर यांनी पुन्हा एकदा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. ते राज्यभरातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेत आहेत. यादरम्यान ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रचार सभेसाठी आले असता त्यांना राहुल यांनी फोन केला असल्याची माहिती आहे. राहुल यांनी आंबेडकर यांच्या प्रकृतीची चौकशी करत काळजी घेण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती. आंबेडकर हे स्वतः काही बैठकींना उपस्थित होते, तरीदेखील जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वतः उमेदवार उभे केले. इतकेच नाही तर काँग्रेसच्या काही उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता; मात्र तरीदेखील अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होता. काँग्रेसने आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार दिल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते; मात्र आता राहुल यांचा फोन आल्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील कटुता कमी होणार का? हे पहावे लागेल. या दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत मात्र अद्याप माहिती समजू शकलेली नाही.