नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांची कोणतीही कृती चर्चेचा विषय ठरत असते. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे असो अथवा उत्तर प्रदेशात शेतकर्यांना गाडीखाली चिरडण्याची घटना असो. पीडितांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याची त्यांची कृती अनेकांना भावली. दिवाळीनिमित्त राहुल गांधी यांच्या निवासस्थानी तामिळनाडूमधील कन्याकुमारीच्या एका शाळेच्या समुहासाठी स्नेहभोजाचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी काय करणार आहात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांनी अगदी विनम्रतेने तसेच उत्तर दिले.
राहुल गांधी यांनी तामिळनाडूच्या एका शाळेतून आलेल्या पाहुण्यांसोबत चर्चा करतानाचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी लिहितात, पाहुण्यांच्या आगमनाने दिवाळी आणखी विशेष साजरी झाली आहे. विविध संस्कृतीचा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे. या संस्कृतीला आपल्याला संरक्षित करायचे आहे.
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये एका पाहुण्याने राहुल गांधी यांना विचारले, जर तुम्ही पंतप्रधान झाले तर पहिला सरकारी आदेश कोणता द्याल? प्रत्युत्तरात राहुल गांधी म्हणाले, मी महिलांना आरक्षण देईल. राहुल गांधी यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला की ते मुलांना काय शिकवणार, प्रत्युत्तरात ते म्हणाले, जर कोणी मला विचारले की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवणार, तर मी म्हणेल, नम्रता. कारण विनम्रता आपल्याला समजूतदार बनविते.
राहुल गांधी यांनी निवासस्थानी आयोजित केलेल्या समारंभात पाहुण्यांसोबत छोले भटुरे खाण्याबद्दलही सांगितले. व्हिडिओमध्ये उपस्थित नागरिकांपैकी एकाने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचे शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, की आंदोलनात शेतकर्यांच्यासोबत असणे तुमची एकता दर्शवत होती. व्हिडिओमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनीही उपस्थित पाहुण्यांशी संवाद साधला. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी महिलांसोबत गाणेही गायले.