नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरीमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार शेतकर्यांवर थेट आक्रमण करत आहे. शेतकर्यांना जीपखाली चिरडले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊला गेलेले असतानाही लखीमपूर खिरी येथे गेले नाहीत, असा निशाणाही त्यांनी साधला.
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना झालेल्या धक्काबुक्कीवर प्रश्न विचारला असता, राहुल म्हणाले की, हा शेतकर्यांचा मुद्दा आहे. प्रियांकासोबत धक्काबुक्की झाली त्याने काही फरक पडत नाही. आम्हाला मारा किंवा गाडा. त्याने काहीही फरक पडत नाही. आम्हाला असेच प्रशिक्षण मिळाले आहे. हा मुद्दा शेतकर्यांचा आहे. लखनऊला जाऊन मला सत्य जाणून घ्यायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
नियोजित हल्ला
सरकार शेतकर्यांची ताकद समजू शकत नाहीये. तिन्ही कृषी कायदे शेतकर्यांवर एक हल्ला आहे. संपूर्ण देशातील शेतकर्यांवर नियोजित पद्धतीने हल्ला केला जात आहे. आधी भूसंपादन विधेयक मागे घेण्यात आले. नंतर तीन कृषी कायदे आणण्यात आले. यूपीमध्ये शेतकर्यांना मारले जात आहे. जे बलात्कार करतात, शेतकर्यांना मारतात ते बाहेर असतात. आणि जे काहीच करत नाहीत त्यांना कारागृहात टाकले जाते हेच सरकारचे धोरण आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आधी परवानगी नाकारली मग दिली
लखीमपूर खिरी हिंचारातील पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार्या प्रियांका गांधी यांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. बुधवारी राहुल गांधीसुद्धा पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत. परिसरात कलम १४४ लावण्यात आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने त्यांना परवानगी नाकारली आहे. राहुल गांधी लखनऊला आल्यास लखीमपूरला न जाण्याची विनंती त्यांना विमानतळावरच करणार असल्याचे लखनऊचे पोलिस आयुक्त डी. के ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान, अखेर उत्तर प्रदेश सरकार नमले असून त्यांनी राहुल गांधी यांना लखीमपूर खिरी येथे जाण्यास परवानगी दिली आहे.