मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांनीदेखील राहुल गांधी यांच्या अशा वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी संपुष्टात येऊ शकते, असा इशारा दिला आहे. असे असतानाच आता राहुल गांधी यांनी राऊतांना थेट फोन केला आहे. या विषयी स्वतः संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.
याबाबत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला होता. याआधीही त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. मात्र त्यांनी काल प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आम्हाला तुमची काळजी होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे राहुल गांधी मला म्हणाले. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
राऊत पुढे म्हणतात की, “राहुल गांधी यांनी केलेला फोन म्हणजे प्रेमाची झुळूक आहे. राजकारणात सध्या कडवटपणा आलेला आहे. पण आपल्या व्यग्र कार्यक्रमात असताना वेळ काढून राहुल गांधी यांनी मला फोन केला. राजकारणात आज कोणी कोणाचा मित्र राहिलेला नाही. मी तुरुंगात असताना माझ्या घरी किती लोक आले, याची मला कल्पना आहे. किती लोकांनी माझी चौकशी केली, याचीही मला कल्पना आहे. ठाकरे परिवार, आमचा पक्ष, शरद पवार यांचे कुटुंबीय, काँग्रेसचे इतर सहकारी अशा लोकांनी माझी चौकशी केली. भारतीय जनता पार्टी, मनसे हे आमचे एकेकाळचे सहकारी होते. मात्र त्यांना माझी चिंता वाटली का?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांची यात्रा थांबवण्यात यावी तसेच त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 21, 2022
Rahul Gandhi Phone Called to MP Sanjay Raut
Politics Congress Shivsena