विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतातील कोरोना स्थिती संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजविला आहे. त्यास पूर्णपणे मोदीच जबाबदार असून त्यांना कोरोना विषाणूचे संकट कळालेले नसल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. देशात अत्यंत धीम्या गतीने लसीकरण सुरू आहे. हे असेच सुरू राहिले तर देशात तिसरी, चौथी आणि अशा कितीतरी लाटा येतील, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.
ऑनलाईन पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की,
– देशातील स्थिती अत्यंत वाईट आहे. त्यास पंतप्रधान मोदी हेच सर्वस्वी जबाबदार आहेत
– आम्ही वारंवार मोदी सरकारला इशारा दिला, जागे करण्याचा प्रयत्न केला पण आमची खिल्ली उडविण्यात आली
– आजपर्यंत पंतप्रधान मोदींना कोरोना आजारच कळाला नाही
– कोरोना हा केवळ एक आजार नाही तर तो सतत बदलणारा संसर्गजन्य रोग आहे. जितकी संधी त्याला मिळेल तितका तो धोकादायक बनेल. दुसरी लाट हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे
– गेल्या वर्षी फेब्रुवारीतच मी कोरोना संकटाबाबत मोदी सरकारला जागृत केले होते पण काहीही झाले नाही
– अमेरिकेत नागरिकांचं ५० टक्के लसीकरण झाले आहे. ब्राझिलमध्ये ८ ते १० टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. असे असताना भारतात केवळ २ टक्के नागरिकांचंच लसीकरण झाले आहे. हे अतिशय गंभीर आहे
– मोदींना परिस्थितीचे भान नसल्यानेच लाखो भारतीयांचा मृत्यू झाला आहे.
– मोदी सरकार खोटारडेपणा करीत आहे. मृतांचे आकडे लपवित आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाले आहे
– कोरोनावर केवळ आणि केवळ लसीकरण हाच उपाय आहे. आणि तेच मोदींना समजलेले नाही.
– लस उपलब्ध नसल्यानेच लॉकडाऊनसारख्या पर्यायांचा स्विकार राज्य करीत आहेत. यातून देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येत आहे.
– जर कोरोनापासून आपण दूर पळालो तर आपण त्याचा कधीच सामना करु शकणार नाही