मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला तमिळनाडूतील कन्याकुमारीपासून प्रारंभ झाला आहे. १५० दिवस चालणारी ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार आहे. एकूण ३५०० किमीचा प्रवास यादरम्यान होणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. एकीकडे भाजपचे मिशन २०२४ तर दुसरीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रेने देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. ही भारत जोडो यात्रा नक्की कशी आहे ते आपण आता जाणून घेऊया…
भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून प्रारंभ झाला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पहिली प्रार्थना सभा झाली. त्यानंतर विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियलला भेट देऊन ही यात्रा पुढे निघाली आहे. तामिळनाडूमधील श्रीपेरुंबदूर येथे राजीव गांधी यांची हत्या झाली होती. तेथील स्मारकाला भेट देऊन यात्रेने आता वेग घेतला आहे.
अत्यंत साधेपणाने
देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत पुन्हा एकदा नाते प्रस्थापित करण्याचा यात्रेचा उद्देश आहे. महागाई, बेरोजगारी, सीमा सुरक्षा आणि इतर ज्वलंत विषयांवर यात्रेदरम्यान भर दिला जाईल. या यात्रेत राहुल गांधींच्या सर्व सुविधा फाईव्ह स्टार नाहीत. ही यात्रा अगदी साधेपणाने होत आहे. अनेक ठिकाणी चौकसभा, सर्वसाधारण सभा होती. राहुल गांधी हे रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये नाही तर कंटेनरमध्ये थांबतील, विश्रांती घेतील. या कंटेनरमध्ये झोपण्यासाठी बेड व टॉयलेटची सुविधा आहे. त्यांच्यासोबत ३०० जण पदयात्रा करत आहेत. यात्रेदरम्यान, तंबू टाकून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत.
https://twitter.com/i_amSartaj/status/1566911006227456001?s=20&t=yW0VpfVsQZbnD6CQ6K43YA
बाबा आमटे यांची यात्रा
स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली होती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांनी देखील अशीच एक यात्रा काढली होती. विशेष म्हणजे देशाच्या राजकारणात माजी पंतप्रधान चंद्रशेखर, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी आतापर्यंत रथयात्रा, पदयात्रा काढून वातावरण निर्मिती केली आहे. सुमारे ३५ वर्षापूर्वी भारतातील धार्मिक द्वेष, दंगलींमुळे वातावरण अत्यंत गढूळ झाले होते त्यामुळे सामाजिक समता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत भारत जोडो नावाने यात्रा काढली होती विशेष म्हणजे बाबा आमटेंनी अशा दोन यात्रा काढल्या होत्या. पहिली कन्याकुमारी ते काश्मीर आणि दुसरी सिलचर ते सौराष्ट्र अशी होती. भारतातील अनुक्रमे दक्षिण-उत्तर व पूर्व-पश्चिम टोके जोडणाऱ्या या यात्रा होय.
https://twitter.com/shubhshaurya1/status/1565375187490447361?s=20&t=yW0VpfVsQZbnD6CQ6K43YA
असे आहेत कंटेनर
यात्रेत तब्बल ६० कंटेनर्सचा ताफा आहे. त्यामुळे जिथे ती थांबेल तेथे छोटेखानी गावच वसले जाईल. हे कंटेनर्स ट्रकवर ठेवलेले आहेत. ठरवलेल्या गावात ते मुक्कामी आधीच गेलेले असतात. दिवस संपला की यात्रेतील नागरिकांपर्यंत हे कंटेनर्स पोहोचतात. एखाद्या गावात नियोजित ठिकाणी कंटेनर्स उभे राहतात. रात्री मुक्काम होतो. एका कंटेनरमध्ये साधारणतः १२ जण झोपू शकतात. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी स्वतंत्र कंटेनरमध्ये झोपतात. पण, जेवण सर्वांचे सोबतच असते. ही यात्रा जवळपास ५ महिने चालेल. दररोज २२ ते २३ किमीचा प्रवास केला जाईल. तसेच ३ दिवसातून एकदा कपडे धुण्याची सोय असेल. रोज सकाळी ७ ला यात्रा सुरु होते. सकाळी १० पर्यंत काम. थोडी विश्रांती. पुन्हा काम. दुपारी ३.३० ते संध्याकाळी ७ पर्यंत यात्रा. ७ नंतर जेवण आणि विश्रांती, असे स्वरुप आहे.
https://twitter.com/_lokeshsharma/status/1567420560577298432?s=20&t=yW0VpfVsQZbnD6CQ6K43YA
महिलांसह मोठा लवाजमा
राहुल गांधींच्या यात्रेत काँग्रेससह अन्य पक्षांचे ११७ नेते सहभागी आहेत. त्यात २८ महिला असून त्यांना राहण्यासाठी वेगळे कंटेनर्स आहेत. तसेच सामान्य कार्यकर्तेही यात्रेत आहेत. तसेच सुरक्षारक्षक, पक्षाच्या संपर्क अभियानाची टीम, फोटोग्राफर, सोशल मीडिया सांभाळणारे सदस्य आहेत. हे सर्व मिळून जवळपास ३०० पेक्षा अधिक जण आहेत. राहुल गांधींच्या यात्रेत काँग्रेस नेतेच नाश्ता आणि जेवण तयार करतात. काही ठिकाणी संबंधित राज्यातील काँग्रेस नेते खाण्या-पिण्याची सोय करतात. नाश्ता आणि जेवण सर्वजण एकत्र करतात.
भाषानिहाय गाणे
या यात्रेसाठी विशेष गाणे विविध भाषात तयार करण्यात आले आहे. ज्या राज्यात यात्रा जाईल तिथे त्या भाषेनुसार हे गाणे लावले जाते. अनेक नेते काँग्रेस सोडून जात आहेत. त्यामुळे पक्षाची अवस्था कमकुवत होत आहे. या यात्रेच्या रूपाने मोठा बदल होण्याची अपेक्षा काँग्रेसजनांना आहे. राजकारणात अजिबात सातत्य नसलेले राहुल गांधी सलग ५ महिने पायी चालणार असल्याने त्याकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे.
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Features Congress Politics Loksabha Election 2024