नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँक घोटाळ्यांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच मोदी सरकारमध्ये ५३५ हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा झाल्याचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. या दरम्यानच राहुल यांनी भाजपच्या ‘अच्छे दिन’च्या नारेवरही निशाणा साधला आहे.
सध्याच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणांवर केंद्राची खिल्ली उडवत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी रविवारी म्हटले की, स्वातंत्र्यानंतर देशात अशी फसवणूक कधीच झाली नाही. एका ट्विटमध्ये राहुल म्हणाले की, मोदीच्या काळात आतापर्यंत 5,35 हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झाली आहे.
तसेच 75 वर्षात भारतातील जनतेच्या पैशांबाबत कधीही अशी हेराफेरी झालेली नाही. लूट आणि फसवणुकीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी चांगले दिवस आहेत. दरम्यान, सीबीआयने एबीजी शिपयार्ड आणि त्याच्या संचालकांविरुद्ध 28 बँकांची 22,842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला. या प्रकरणात, सीबीआयने शनिवारी सांगितले की त्यांनी एबीजी शिपयार्ड लिमिटेड आणि तिचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल तसेच तत्कालीन कार्यकारी संचालक संथानम मुथास्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल आणि रवी विमल यांना अटक केली होती. तर नेवेटीया विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, एबीजी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या आणखी एका कंपनीवरही गुन्हेगारी कट, फसवणूक, गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि अधिकृत पदाचा दुरुपयोग या गुन्ह्यांसाठी IPC आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळेच आता या प्रकरणावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्लाबोल केला होता, आता राहुल गांधींनी संपूर्ण बँक घोटाळ्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. सुरजेवाला यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, सार्वजनिक फसवणूक आणि सार्वजनिक पैशांचा अपहार करूनही, सीबीआय, एसबीआय आणि मोदी सरकारने नोकरशाहीतील वाद आणि फाइल पुशिंगमध्ये संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचे केले.