नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देशाच्या संविधानामध्ये भारताचा एक दृष्टिकोन आहे. हे केवळ एक पुस्तक नाही, तर जगण्या- मरण्याचा मार्ग आहे. देशात जगताना एकमेकांचा आदर करू. एक व्यक्ती, एक संस्था ही संपूर्ण हिंदुस्थानची संपत्ती आहे, असे त्यात कुठेही म्हटलेले नाही. प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक जातीचा, धर्माचा, प्रत्येकाच्या मतांचा आदर केला पाहिजे. जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघा (आरएसएस)चे, भाजपचे लोक संविधानावर हल्ला करतात, तेव्हा ते केवळ या पुस्तकावर हल्ला करीत नाहीत, तर या देशातील महापुरुषांच्या विचारधारेवर, जनतेच्या आवाजावर हल्ला करतात, अशी घणाघाती टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.
येथे आयोजित संविधान सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ त्यांनी फोडला. ते म्हणाले, की संविधानाने या देशातील संस्था तयार होतात. संविधान नसते, तर निवडणूक आयोगदेखील नसते. राजा महाराजांजवळ ‘इलेक्शन कमिशन’नव्हते. त्यामुळे या संविधानमुळे शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्र इत्यादी संस्था मिळातात; मात्र आरएसएस यावर थेट हल्ला करत नाही, ते भितात. कारण समोरून लढायला तयार झाले, तर ते पाच मिनिटात हरतील, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणून ते लपून वार करतात.
देशाच्या प्रत्येक राज्यात अशी काही नावे मिळतात, की त्यांची आपण आठवण करतो. त्यातून प्रेरणा मिळते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा आपण देतो, त्यांच्या चर्चा आपण करतो, त्या वेळी त्या केवळ एका व्यक्तीबद्दल नाही, तर कोट्यावधी लोकांचा आवाज असतो. डॉ. आंबेडकर बोलत होते, तेव्हा दुसऱ्यांचे दुःख त्यांच्या तोंडातून निघत होते. मी महामानव आंबेडकर यांची अनेक पुस्तक वाचली आहेत. मला काय हवे आणि जनतेला काय हवे यातून ते जनतेचा विचार करत होते. देशात करोडो दलित आहे. त्यांचे दुःख, त्यांचा आवाज या संविधानात यायला हवा. या संविधानात फुले-शाहू-आंबेडकर-गांधी यांचा आवाज आहे, असे राहुल म्हणाले.
देशात ९० टक्के लोकांजवळ काही ताकद नाही. याचा काय अर्थ? बिना शक्ती, संपत्ती सन्मानाचा काय फायदा? मी म्हटले उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख करा, त्यात ओबीसी, दलित नावे नव्हती. न्यायव्यवस्था बघितली तर तेथे मोठे अधिकारी बघा. यात ९० टक्के भारत आपल्याला दिसतच नाही. अदानी यांच्या कंपनीत मोठ्या पदांवर एक दलित नाही, आदिवासी नाही. पाच टक्के लोक देशाला चालवत आहे. १६ लाख कोटी रुपये त्यांचे माफ होतात. कर्नाटकात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. माझ्यावर टीका केली, असे सांगून राहुल यांनी गौतम अदानी यांच्यावर टीका केली. अदानी यांनी कर्ज फेडले नाही, तर त्याला देशभक्त मानतात. शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही, तर त्याला डिफॉल्टर मानता, असे ते म्हणाले.
जातीय जनगणना म्हटले, तर मोदी यांची झोप उडाली आहे. मोदी यांचा चेहरा बदलला. मी ॲम्लीफायर आहे. लोकांना सांगणे माझे काम आहे. लोकांचा आवाज ऐकणे काम आहे. काहीही करा जातीय जनगणना होणार आणि आरक्षणाची ५० टक्के मर्यादा तोडणार, असे राहुल म्हणाले.