इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासून अशी थेट धमकी ठाकरे गटाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुध्दचे अपशब्द सहन करणार नाही असेही ते म्हणाले. आम्ही स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीमध्ये राहतो, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत काही अपशब्द वापरले होते, त्याबाबत आम्ही त्यांचा निषेध करतो. आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले.
यावेळी दराडे म्हणाले की, आम्ही महाविकास आघीडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी गेली खड्ड्यात. नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी बाळा दराडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला.
या धमकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोणत्याही सोम्या गोम्यांच्या भ्याड धमक्यांना राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष घाबरत नाही. राहुल गांधींचे वडील राजीव गांधी आणि आजी इंदिरा गांधींनी देशासाठी बलिदान दिले आहे.
कोणी भ्याड स्वरूपाच्या धमक्यात येत असतील तर त्यांना आमचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता पुरून उरेल. राहुल गांधी सावरकरांबद्दल काय बोलले याची समीक्षा होत असेल तर आम्हाला आनंदच आहे. वाजपेयी सरकारमधील मंत्री असलेले भाजपचे खासदार अरुण शौरी यांनी सावरकर बद्दल पुराव्यानिशी लिखाण केले आहे, त्याच प्रकारची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. अशा धमक्या देणाऱ्यांना काँग्रेस कार्यकर्ते नक्कीच पाहून घेतील.