इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नातवाने राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सात्यकी सावरकर यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल केली होती.
सात्यकी यांनी पुण्यातील न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा केला आहे, की राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील त्यांच्या भाषणात असे म्हटले होते, की सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते, की त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती. याचिकेनुसार सावरकरांनी हे कुठेही लिहिलेले नाही.
न्यायालयाने पोलिसांना या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. विश्रामबाग पोलिस ठाण्याने तपास केला असता तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे सांगितले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खासदार/आमदारांच्या विशेष न्यायालयाने चार ऑक्टोबर रोजी गांधी यांना समन्स बजावले होते आणि त्यांना २३ ऑक्टोबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते; मात्र गांधी हजर झाले नाहीत. कारण त्यांना समन्स मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले, की गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती.