इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गांधी यांनी मोदी यांच्या ‘एक है तो सुरक्षित है’ या घोषणेचा अर्थ सांगितला आहे. मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी तिजोरी उघडली आणि त्यातून गौतम अदानी आणि मोदी यांचे पोस्टर काढले. राहुल यांनी धारावीचे चित्र दाखवले आणि कोण आहे, कोण सुरक्षित आणि कोण सुरक्षित असा सवाल केला.
राहुल म्हणाले, की धारावीची जमीन तिथे राहणाऱ्या लोकांची आहे. ते तिथे वर्षानुवर्षे राहतात. धारावीचे रुपांतर करताना अनेक अडचणी येत आहेत. खारफुटीची जमीन हिसकावून घेतली जात आहे. एका व्यक्तीसाठी सर्व नियम बदलण्यात आले. देशातील बंदरे, विमानतळ, संरक्षण उद्योग, धारावी, सर्व काही पंतप्रधानांशी जुने नाते असलेल्या व्यक्तीकडे सोपवले जात आहे. अदानी हे काम एकटे करू शकत नाही. पंतप्रधानांची मदत घेतल्याशिवाय ते लोकांकडून धारावीची जमीन घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेला संपत्ती मिळणार, की एका व्यक्तीकडे जाणार हा निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा आहे.
महाराष्ट्र निवडणूक ही गरीब आणि काही अब्जाधीश यांच्यातील निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईत जमीन मिळवायची आहे. कोट्यधीशांना सुमारे एक लाख कोटी रुपये देण्याची तयारी आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब आणि बेरोजगारांना मदत करणे हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. महागाई आणि बेरोजगारी हे राज्यातील प्रमुख प्रश्न आहेत, असे सांगून ते म्हणले, की अदानी टेंडरिंग प्रक्रिया कशी चालते हे सर्वांना माहीत आहे. ‘सीबीआय’, ‘ईडी’, प्राप्तिकर विभाग यांचा लोकांवर दबाव टाकण्यासाठी कसा वापर केला जातो, हे सर्वांनाच माहीत आहे. याचे उदाहरण आपण मुंबई विमानतळावर पाहिले. सत्य हे आहे, की अदानी यांना मोदी यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांना हवे ते मिळते, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. अदानींच्या हितसंबंधांना पूर्ण पाठिंबा दिला जात आहे.
आज धारावीतील जनतेच्या हिताला महत्त्व दिले जात नसून अदानींच्या हिताला पूर्ण पाठिंबा दिला जात आहे. हे फक्त धारावीपुरते मर्यादित नाही. खारफुटीची जमीन आणि पूररेषेतील मैदानेही दिली जात आहेत, असा आरोप करून धारावीतील जनतेला आणि महाराष्ट्रातील जनतेला फायदा व्हावा, अशी आमची इच्छा आहे. धारावीतील लोकांच्या अपेक्षेनुसार विकास केला जाईल. केवळ एका व्यक्तीसाठी नियम चालणार नाहीत, असे राहुल म्हणाले.