इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नंदुरबारः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करीत असतात; परंतु लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर महाराष्ट्रातील उद्योग पळविल्यामुळे पाच लाख तरुणांचा रोजगार बुडाला, अशी टीका करताना आकडेवारी दिली. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या हातात राज्यघटना नसते. निव्वळ कव्हर असतो, हा आरोप खोटा ठरवताना त्यांनी आपल्या हातातील राज्यघटनेची पाने उलगडून दाखवली.
महाराष्ट्रातून किती कोटींची गुंतवणूक गुजरातला गेली आणि त्यामुळे राज्यातील किती लाखांचा रोजगार गुजरातला गेला, याबाबत राहुल यांनी आकडेवारी दिली. राहुल यांनी मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदी यांना संविधानाबद्दल काहीच माहिती नसून संविधानाचा त्यांचा अभ्यास नाही. देश संविधानानुसार चालतो. काँग्रेस पक्ष संविधानाच्या विचारावर चालतो. संविधानाला हजारो वर्षाची परंपरा असून थोर संत, आदिवासी क्रांतिकारक यांचे विचार या संविधानामध्ये आहेत.
संविधानामध्ये क्रांतिकारकांचा आत्मा आहे. याला खोटे म्हणण्याचे काम मोदी करत आहेत. संविधानामुळे आदिवासींना आदिवासी म्हणून संबोधले जाते. आदिवासी देशाचे पहिले मालक असून जल, जंगल, जमीन यांवर आदिवासी समाजाच्या अधिकार आहे. भाजप आणि मोदी आदिवासींना त्यांच्या मूळ हक्कापासून दूर ठेवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.
भारताच्या ९० महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये फक्त एक आदिवासी अधिकारी आहे आणि त्यांनाही मागे बसवले जाते, असा दावा राहुल यांनी केला. तसेच वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प होता, त्यामधून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. १.२ लाख कोटींचा हा प्रकल्प होता. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गुजरातला पाठला. टाटा एअरबस मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पातून दहा हजार रोजगार निर्मिती होणार होती. हा १.८ लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. आयफोन निर्मितीचा दोन लाख कोटींचा प्रकल्प होता, तो ही गुजरातला नेण्यात आला. त्यातून ७५ हजार युवकांना रोजगार मिळाला असता. आणखी एका प्रकल्पातून ८० हजार जणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला गेला. ‘गेल पेट्रो केमिकल’चा सात हजार कोटींचा प्रकल्प होता. यामधून २१ हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार होती.
हा प्रकल्प दुसरीकडे पाठवण्यात आला. हे सर्व मिळून विचार केलास राज्यातील ५ लाख नोकऱ्या दुसरीकडे या सरकारने पाठवल्या. त्यामुळे तुम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत, अशी आकडेवारी सादर करून हे काम ‘इंडिया’ आघाडी करणार नाही, असा दावा राहुल यांनी केला.
तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. ही लढाई संविधानासाठी सुरू असून जे मिळते ते सर्व संविधानानेच मिळते. या संविधानाचा अपमान भाजपकडून केला जात आहे. फुले, आंबेडकर, गांधींचा अपमान हे लोक करत आहेत, अशा शब्दांत राहुल यांनी निशाणा साधला.
…………