इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बुलडाणाः लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची चिखली येथील सभा रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक व्हिडीओ संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मला आज चिखलीला यायचे होते. तेथे मला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भेटायचे होते आणि एका जाहीर सभेला संबोधित करायचे होते; पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकलो नाही.
महाराष्ट्रातील शेतकरी खूप अडचणींचा सामना करत आहेत. भाजप सरकार सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव देत नाही; पण मी तुम्हाला आश्वासित करतो, की आमचे सरकार आल्यानंतर सरकार तुमची काळजी घेईल आणि तुमच्या समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे त्यांनी या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. मला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती समजते आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या होत्या; पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत आणि त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली.