वॉशिंग्टन – अमेरिकेचे राजदूत, हेर आणि सुरक्षारक्षकांच्या डोक्यावर मायक्रोवेव्ह आणि रेडिओवेव्ह द्वारे हल्ले करण्याचे एक प्रकरण उघड झाले आहे. सध्या अशा हल्ल्यांना वेग आला आहे. या हल्ल्यांमागे कोण आहे, हे शोधण्यास वैज्ञानिक आणि सरकारी अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. जर या हल्ल्यामागे अमेरिकी विरोधकांचा कट असल्याचे निष्पन्न झाल्यास अमेरिकेकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हवाना सिंड्रोम असे नाव
ज्यो बायडेन प्रशासनाने प्रकरणाची गंभीरता बघून चौकशी करण्यासह यामध्ये प्रभावित झालेल्या लोकांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारचा पहिला हल्ला क्युबा येथील अमेरिकी दूतावासात २०१६ मध्ये करण्यात आला होता. त्याला हवाना सिंड्रोम असे नाव देण्यात आले आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून चौकशी
सध्या अशा प्रकारचे १३० प्रकरणे समोर आले आहेत. एक डझनाच्यावर हल्ले गेल्या वर्षीच नोंदविले गेले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
जोरदार आवाज
ज्या लोकांवर असा हल्ला झाला, त्यांना डोकेदुखी आणि चक्कर आल्याचे डॉक्टरांना सांगितले आहे. काहींनी हल्ल्यापूर्वी जोरदार आवाज झाल्याचेही सांगितले आहे.
व्हाईट हाउसजवळच
वॉशिंग्टनमध्ये कमीत कमी अशा दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक हल्ला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये व्हाईट हाउसजवळ झाला होता. या हल्ल्यामुळे एका अधिकाऱ्याला चक्कर आल्याचे सांगितले.
गंभीरता दाखविली नाही
सरकारने या समस्येला गंभीरतेने घेतले नसल्याचा आरोप यात प्रभावित झालेल्या लोकांचे वकीलपत्र घेतलेल्या एका वकिलाने केला आहे. सरकारला याबाबत आधीपासूनच माहिती होते, परंतु त्यांनी कोणतीच पावले उचलली नाहीत, असा आरोप केला. राष्ट्रीय सुरक्षा संस्थांच्या कागदपत्रांचा उल्लेख करून ते म्हणाले, सरकारकडे १९९० मध्ये एका शत्रूदेशाकडून या प्रकारच्या हल्ल्याची माहिती होती.
अधिकाऱ्यांचे पथक
ट्रम्प प्रशासनाच्या अंतिम कार्यकालात कार्यवाहक संरक्षणमंत्री क्रिस मिलर यांनी या हल्ल्याच्या चौकशीसाठी पेंटागनच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले होते. या हल्ल्यातील पीडित एका सैनिकाला भेटल्यानंतर मिलर यांनी चौकशीचे आदेश दिले होते.