नाशिक: राज्यांतर्गत आणि देशांतर्गत व्यापार करण्याइतकच आंतरराष्ट्रीय व्यापार करणं ही सोपे आहे. जितकी जोखीम देशांतर्गत व्यापारात आहे तितकीच जोखीम परदेशी व्यापार अर्थात निर्यात करण्यात आहे. प्रत्येक व्यावसायिकाने ही जोखीम पत्करणे गरजेचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय व्यापार तज्ञ राधेश्याम डागा यांनी व्यक्त केले. इंडिया दर्पण फेसबुक लाइव्हमध्ये ते बोलत होते. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली.
परदेशी बाजारात माल विकताना अनेकांना भीती वाटते त्याविषयी ते म्हणाले की, अनेक लघुउद्योजक असा विचार करतात की माझं इथेच चांगल चाललं आहे तर कशाला परदेशी बाजारपेठेत जायचं. पण तुमच्या मालाला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असेल तर परदेशात सुद्धा नक्कीच चांगली मागणी मिळेल. आज जागतिकीकरणामुळे आव्हाने, स्पर्धा वाढली आहे. बाहेरच्या देशातल्या कंपन्या आपल्याकडे येऊन माल घेऊन बाहेर विकतात. अशावेळी ‘आत्मनिर्भर भारत’ या योजनेअंतर्गत आपल्याच उद्योजकांनी माल बाहेरच्या देशात निर्यात केला तर बिझिनेस आणि ग्राहक दोन्ही वाढेल. तुमच्याकडे असलेला कोणताही माल तुम्ही निर्यात करू शकता, प्रत्येक मालाला बाहेर मागणी आहे. आज अनेक लघुउद्योजक माल एक्स्पोर्ट करतात त्यामुळे न घाबरता प्रत्येक व्यावसायिकाने पुढे आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सरकारने कागदपत्रांमध्ये सुद्धा खूप सुटसुटीतपणा आणलेला आहे. तुम्ही स्वतः ऑनलाइन पद्धतीने इम्पोर्ट एक्स्पोर्ट लायसन्स काढू शकता. त्यात काही अडचणी आल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घेऊ शकतो. या लायसन्ससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक डिटेल्स ही बेसिक कागदपत्रे लागतात. तसेच पुढे ते म्हणाले की, बऱ्याचदा भाषेचा अडसर जाणवतो. पण हल्ली सगळीकडे इंग्रजी भाषा वापरली जाते. बिझिनेस पुरती इंग्रजी भाषा समजली तरी काही अडचण येत नाही. आणि अगदीच अडचण आली तर ट्रान्सलेटरची सोय असते. भाषेपलीकडे जाऊन त्या देशाची संस्कृती तिथल्या पध्दती, खाद्यसंस्कृती माहित करून घेणे आवश्यक आहे. त्याचा व्यवसायासाठी नक्कीच फायदा होईल.
आज महिला बचत गट, शेतकरी अनेक वेगवेगळ्या प्रकारचा माल तयार करतात. हा माल देशात विकणारे खूप आहेत पण देशाबाहेर विकणारे कमी आहेत. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ई कॉमर्स सारखी प्रणाली आहे तसेच ऑनलाइन सगळी माहिती उपलब्ध आहे. सरकारी योजना आहेत त्याचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक सक्षम होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता निर्यात करण्यासाठी पुढे या असा सल्ला राधेश्याम डागा यांनी दिला.