सिन्नर – जेष्ठ उद्योजक, हॅाटेल पंचवटीचे सर्वेसर्वा राधाकिसन तथा राधूभाऊ रामनाथशेठ चांडक (७९) यांचे आज दुपारी २ च्या दरम्यान नाशिक येथील राहत्या घरी निधन झाले. नऊ महिन्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांची ही एक्झिट सर्वांना चटका लाऊन गेली. संपूर्ण चांडक परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणून काम पाहणा-या राधूभाऊंनी सर्वच क्षेत्रात आपला मोठा मित्र परिवार जमवला होता. त्यांच्या निधनामुळे चांडक परिवार व त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे.
सिन्नर येथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेल्या राधाकिसन यांनी १९६७ च्या दरम्यान वडीलांच्या कोंबडा विडी उद्योगात लक्ष घालण्यास सुरुवात करत विडी व्यवसाय उत्कर्षाला आणला. सिन्नर सोबतच निजामाबाद, अहमदनगर, सोलापूर, येथील विडी कारखाने सांभाळतांनाच हॅाटेल पंचवटीच्या निमित्ताने त्यांनी हॅाटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. नाशिकच्या वकीलवाडीत सुरु केलेल्या हॅाटेल पंचवटीच्या उदघाटनास सिनेस्टार सुनिल दत्त यांना त्यांनी आणले होते. त्यानंतर नाशिकच्या पंचवटीची संगमनेर, सिन्नर, अहमदनगर, जबलपूर येथेही हॅाटेल पंचवटीच्या शाखा उघडल्या. मुंबई, पुणे येथे सुध्दा त्यांनी पंचवटी थाळी सुरु केली. मुंबईत पंचवटी थाळीचे उदघाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. नाशिकच्या त्र्यंबकरोडला त्यांनी हॅाटेल पंचवटी इलाईट सुध्दा सुरु करुन सर्व लक्ष हॅाटेल व्यवसायात केंद्रीत केले.
सिन्नर नगर, परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी त्यांचे लहान भाऊ कै. जगूभाऊ यांना उभे करण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जगूभाऊ यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकत वडील. कै. रामनाथशेठ चांडक यांच्यानंतर थेट नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला होता. एक रुपयाही खर्च न करता जिंकलेल्या या निवडणुकीनंतर सिन्नर शहराच्या विकासासाठी राधूभाऊ यांनीच चांडक ट्रस्टच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च केले. त्यातून शहराचा विकास केला. शहरातील हजारो गरीब रुग्णांना ट्रस्टच्या माध्यमातून मोफत औषधे उपलब्ध करुन देण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरु केला.चांडक परिवाराने त्यांच्या मार्गदर्शानाखाली अनेक संस्थाना देणग्या दिल्या. सिन्नर येथील मुलींच्या पहिल्या शाळेला त्यांनी देणकी दिली. आजही हे चांडक कन्या विद्यालय शैक्षणिक क्षेत्रात स्वताचा दबदबा निर्माण करुन आहे. शेजारच्या संगमनेर व नाशिक शहरातही त्यांच्या देणग्यातून अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहे.
फिरण्याची प्रचंड हौस असणा-या राधूभाऊंनी आपल्या परिवारासोबत अमेरिका, आफ्रिेका, सह विविध देशाचा दौरा केला होता. शिस्तीचे आयुष्यात कोटकोर पालन करणारे राधूभाऊ दररोज सायंकाळी नाशिकच्या गोल्फ क्लबच्या मैदानावर न चुकता फिरायला जायचे, गेल्या दोन तीन वर्षापूर्वी त्यांनी सर्व व्यवसाय मुलगा अतुल व नातू गौरव यांच्यावर सोपवून व्यवसायातून निवृत्ती घेतली होती.
सिन्नरच्या विकासात मोलाचा हातभार लावला – छगन भुजबळ
ज्येष्ठ उद्योजक राधाकिसन चांडक यांचे वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले. सिन्नरच्या विकासात राधाकिसन चांडक यांनी मोलाचा हातभार लावला आहे. त्यांनी नाशिकसह राज्यभरात पंचवटी हॉटेलची मालिका उभारली. सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर होते. महाराष्ट्र महेश सेवा निधी या संस्थेच्या अध्यक्षपदावरून विधवा महिलांना पेन्शन योजना लागू करण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. नाशिकच्या सांस्कृतिक चळवळीत अग्रस्थानी असलेल्या संस्कृती वैभव या संस्थेत त्यांनी महत्वाची पदे भूषविली. त्यांच्या निधनाने एक ज्येष्ठ उद्योजक काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने चांडक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय चांडक कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो अशा शब्दात पालकमंत्री भुजबळ यांनी श्रध्दांजली अर्पण केली.