मालेगाव – डाक विभागात टपाल जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा योजनेसाठी थेट एजंटच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी ३१ जुलै पर्यंत डाक अधिक्षक, मालेगांव जि.नाशिक यांचे कार्यालयात रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठविण्याचे आवाहन डाक अधिक्षक एन. एस. येवला, मालेगाव विभाग यांनी केले आहे.
उमेदवार इयत्ता १० वी अथवा समतुल्य परिक्षा उत्तीर्ण असावा, उमेदवाराचे वय १८ ते ५० दरम्यान असावे, संगणकाचे ज्ञान आणि स्थानिक ठिकाणाचे ज्ञान असावे, इतर कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा, उत्तीर्ण उमेदवारास सुरक्षा अनामत म्हणून रक्कम रुपये ५ हजार भरणे बंधनकारक राहील, उमेदवारास अतिरिक्त प्रशिक्षण दिले जाईल व त्यानंतर परवाना मिळण्यासाठी उमेदवारास परिक्षा उत्तीण होणे अनिवार्य राहील, असेही येवला यांनी सांगितले.
बेरोजगार, स्वयंरोजगारीत तरुण, सेवानिवृत्त सैनिक, पुर्वी विमा प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या व्यक्ती, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ सदस्य, निवृत्त शिक्षक, बचत गट प्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि वरिल अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्ती यांची नेमणूक मुलाखतीव्दारे करण्यात येईल. यासाठी ३१ जुलै पर्यंत सादर करावयाच्या अर्जासोबत चार फोटो, दहावीचे गुणपत्रक, पॅन कार्ड, आधार कार्डची छायांकीत प्रत जोडावी. अर्जाचा विहीत नमुना डाक अधिक्षक कार्यालय, मालेगाव तसेच पोस्ट मास्तर मालेगाव हेड पोस्ट ऑफीस येथे उपलब्ध असून इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन डाक अधिक्षक श्री. येवला यांनी केले आहे.