मुंबई – माझा राजीनामा मागताय… पोलिस ठाण्यात तक्रार देताय… राज्यपालांकडे जाताय… या देशात मोदी नावाचा कायदा आलाय का ? त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्यपाल महोदयांकडे देण्यात आले आहेत का ? मोदी कायदा आला असेल आणि अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल यांच्याकडे असेल तर त्याची माहिती द्यावी अशी मागणी करतानाच मला बोलण्याचा अधिकार आहे आणि मी बोलणारच असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला.
भाजपकडून सरकारवर आणि वैयक्तिक वारंवार होणाऱ्या टिकेला आज नवाब मलिक यांनी उत्तर दिले. यावेळी येणाऱ्या काळात भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे संकेतही दिले. मलिक यांनी भाजपच्या माजी आमदाराने रेमडेसिवीरचा केलेला काळाबाजार याची माहिती माध्यमांसमोर मांडली. यावेळी काही कागदपत्रे आणि व्हिडिओ त्यांनी प्रसिध्दीस दिले.
या देशात कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर मात्र रेमडेसिवीर मिळत नाही असे चित्र निर्माण झाले. त्याचकाळात भाजपाच्या सुरत येथील कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याच्या प्रकरणावर आम्ही बोट ठेवले. मात्र गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी रेमडेसिवीर वाटप करण्यास किंवा साठा करण्यास परवानगी दिली नसल्याचा स्पष्ट खुलासा केला होता. त्यादिवसापासून भाजपचे काही नेते ५० हजार रेमडेसिवीर आणून देऊ असा दावा करत होते. भाजपच्या माध्यमातून मे – एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध झाला होता असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
भाजपाचे जळगाव – अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुप चालवणारे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता. त्यांनी स्वतः फोटो जाहीर केले आहेत. त्यामध्ये ग्रुप फार्माला ओन्ली फॉर एक्स्पोर्ट हे औषधांवर लिहिलेले असताना ८ एप्रिल रोजी चौधरी बांधवाकडून रेमडेसिवीर रांगा लावून वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवस लॉकडाऊन असल्याने वाटप करण्यात येणार नाही असे सांगून १२ एप्रिलला पुन्हा वाटप करण्यात आले. जवळपास ७०० – ८०० इंजेक्शन वाटण्यात आले आहे. परंतु आमच्या माहितीनुसार २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी ७०० – ८०० इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
हिरा ग्रुपचे शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने परवाना दिला होता का? किंवा दमणच्या एफडीएने परवाना दिला होता का? असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.एखादा नेता जो आमदार राहिलेला आहे. तो बेकायदेशीरपणे २० हजाराचा साठा ठेवतोय, विकतोय, वाटप करतोय आणि नंतर तोच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटला होता. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात धंदा सुरू होता. त्याचवेळी आमचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे तक्रार करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.कालच एफडीएने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
तीन दिवसापूर्वी यावर एक प्रश्न निर्माण केल्याचे सांगताना रेमडेसिवीरचा तुटवडा असताना निर्यात कंपन्या आहेत त्यांच्याकडे आमचे अधिकारी संपर्क करत होते. मात्र रेमडेसिवीर आम्हाला द्यायला तयार नाही अडवणूक करत होते असा आरोप होता. ब्रुक फार्माला राज्यसरकारच्या एफडीएने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित दमणच्या एफडीएने महाराष्ट्राला रेमडेसिवीर देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते. हाच मुद्दा तीन दिवसापूर्वी उपस्थित केला होता. केंद्राकडून अडवणूक होतेय ती थांबली पाहिजे त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि तुटवडा दूर करण्याचे आश्वासन दिले होते. आम्ही राजकारणासाठी हा विषय आणला नव्हता तर जनहितासाठी समोर आणल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
ब्रुक कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वकिलपत्र घेऊन गेले होते. त्यानंतर माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात झाली. मी सांगू इच्छितो, माझ्या जावयाचा विषय समोर आणला जात आहे. जावयाला अटक झाल्यामुळे नवाब मलिक केंद्राच्या विरोधात आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी मी स्पष्ट सांगितले होते की, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. जो काही निर्णय न्यायालयात होईल तो होईल. जे सत्य आणि असत्य आहे ते बाहेर येईलच असे नवाब मलिक म्हणाले.
माझ्याकडे बोट दाखवत असताना क्रिस्टल कंपनीच्या मालकाला सांगू इच्छितो की, तुमचा कारभार किती क्रिस्टल आहे याचा भांडाफोड आज ना उद्या करणारच, भतीजाचा भाग किती कुणी खाल्ला हेही समोर आणणार आहे. कांदिवली – मालाडचे जे आमदार आहेत ते कुठे रात्री बसतात, दुपारी कुठे बसतात. त्यांच्याजवळचे लोक ईडीमार्फत तुरुंगात आहेत. त्यांच्याकडून काय काय घेतलंय. किती देवाणघेवाण झाली याची माहितीही येणाऱ्या काळात सांगू असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.
आम्ही मुद्दा उपस्थित करतो त्याचे उत्तर अपेक्षित आहे. ही साठवण करणारी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. काळाबाजार करत आहेत त्यांना वाचवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. हे राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना अॉक्सीजनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिवीर लोकांना भेटेल. केंद्रसरकारकडून जे विषय दुर्लक्षित होतायत. त्याकडे लक्ष द्या असे सांगितल्यावर व विषय समोर आल्यावर केंद्रसरकार जागे झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्हयात काळाबाजार सुरू आहे त्याची संपूर्ण माहिती, फोटो आणि व्हिडिओ देत असून नंदुरबारमध्ये कारवाई सुरू झालीय. इतर दोषींवर कारवाई होईल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यात २ लाख ७० हजार कोरोनाची आकडेवारी वाढत आहे त्यामुळे चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे. त्याचबरोबर संपूर्ण देशात, राज्यात अॉक्सीजन, रेमडीसीवीरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे असे असताना भाजपच्या काही लोकांना राजकारणाशिवाय काही करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. गेल्या पाच दिवसात भाजपने सरकार कामच करत नाही, रेमडीसीवीर उपलब्ध करुन देत नसल्याचा प्रचार केला आहे परंतु सत्यपरिस्थिती वेगळी असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
—