छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – क्यू आर कोड आपल्यासाठी नवीन राहिलेले आहे, विविध प्रकारचे डिजिटल पेमेंट करण्यासाठी हमखास क्यू आर कोडचा पर्यय वाढला आहे. मात्र, हाच क्यू आर कोड आता घराचा पत्तादेखील सांगणार आहे. वाचून आश्चर्य वाटून घेऊ नका. छत्रपती संभाजीनगर महापालिका हा प्रयोग राबविणार असून यामुळे नवख्या व्यक्तींना शहरातील प्रमुख सार्वजनिक स्थळे तसेच हवे त्या जागी पोहचण्यासाठी आवश्यक असलेला पत्ता शोधणे सहजसोपे होणार आहे.
डिजिटल पेमेंट असो ऑनलाइन रिडींग असो… क्यू आर कोड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी चहाच्या टपरीपासून ते मोठाल्या शोरूमपर्यंत क्यू आर कोडची चलती आहे. क्यू आर कोडच्या माध्यमातून अनेक असाध्य आणि कल्पनेपलीकडील गोष्टी शक्य होताहेत. या पार्श्वभूमीवर आता क्यू आर कोडद्वारे पत्ता शोधण्याचा प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथे राबविण्यात येणार आहे. बाहेरगावून आलेल्या एखाद्या व्यक्तीने तुमचा पत्ता मागितला तर त्याला सविस्तर सांगत बसायची अजिबात गरज राहणार नाही.
एक कोड शेअर केला तर समोरचा व्यक्ती क्युआर कोड स्कॅन करून थेट तुमच्या घरासमोर हजर राहील. एखाद्या दुकानातून सामान, खाद्यपदार्थ मागविले तर डिलिव्हरी बॉयला पत्ता शोधायला सोपे जाईल. त्यामुळे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात तुमचे घर असल्यास एका क्लिकवर तुम्हाला ॲड्रेस मिळणार आहे. प्रत्येक मालमत्तेवर एक डिजिटल अॅड्रेस असेल तर शोध घेणाऱ्याचे काम सोपे होऊ शकते. मोठ्या शहरांमध्ये ही पद्धत वापरण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरातही डिजिटल ॲड्रेस पद्धत राबविण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी नागरिकांवर कोणताही अतिरिक्त खर्च पडणार नाही. या पद्धतीमध्ये गुगल मॅपप्रमाणे व्यक्ती थेट संबंधित पत्त्यावर जाऊन उभा राहू शकतो. त्यामुळे कोणतीही पत्ता शोधणे सोपं होणार आहे.
कॅलिफोर्नियात प्रयोग यशस्वी
कॅलिफोर्नियात क्यूआर कोडद्वारे पत्ता शोधण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. ज्यामुळे ड्रोनद्वारे अचूक पत्त्यावर सामान पाठविण्यात येते. भारतात अलीकडेच काही शहरात डिजिटल पत्त्यांकडे वाटचाल केली आहे. यात घर क्रमांक, मालमत्ता क्रमांक, नळ कनेक्शनची माहिती, सिटी सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक, जीपीएस लोकेशन, मालमत्ताधारकाचे नाव आदी माहिती टाकली जाते.
QR Code Home Address Digital Address First City