अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतातील मल्टिप्लेक्स उद्योगात मोठा बदल होणार आहे. भारतातील दोन सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स साखळी – पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स लीझर यांच्यातील विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. वास्तविक, पीव्हीआर आणि आयनॉक्स कंपनीच्या बोर्डांची रविवारी, २७ मार्च रोजी हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर विलिनीकरणाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यासोबतच पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली हे कंपनीचे नवे एमडी असतील हेही निश्चित करण्यात आले आहे. या विलीनीकरणानंतर आता पीव्हीआर आणि आयनॉक्स १५०० स्क्रीन असलेली देशातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स साखळी बनतील.
पीव्हीआर लिमिटेडने रविवारी सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने कंपनीसोबत आयनॉक्स लीझर लिमिटेडच्या विलीनीकरण योजनेला मान्यता दिली आहे. तसेच आयनॉक्सच्या बोर्डानेही विलीनीकरणाच्या योजनेलाही मान्यता दिली आहे. या करारानंतर आता चित्रपट प्रदर्शन उद्योगाचे नवे रूप पाहायला मिळणार आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. आयनॉक्सच्या १० समभागांसाठी पीव्हीआरचे तीन शेअर्स एकत्रीकरणासाठी शेअर एक्सचेंज रेशो असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोन्ही कंपन्या एकत्रित विलीन झाल्याने आता १६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप असलेली एक मोठी कंपनी बनली आहे. आयनॉक्स लीझरचा शेअर शुक्रवारी ६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ४७० प्रति शेअरवर बंद झाला होता. त्याचे मार्केट कॅप ५ हजार ७०० कोटी रुपये होते. पीव्हीआरचे शेअर्स शुक्रवारी १.५५ टक्के वाढून १८०४ रुपयांवर बंद झाले.
आयनॉक्स सध्या ७२ शहरांमधील १६० मालमत्तांमध्ये ६७५ स्क्रीन चालवते, तर पीव्हीआर ७३ शहरांमध्ये १८१ मालमत्तांमध्ये ८७१ स्क्रीन चालवते. हे दोघे मिळून १०९ शहरांमधील ३४१ मालमत्तांवर १५४६ स्क्रीन चालवणारी भारतातील सर्वात मोठी चित्रपट प्रदर्शनी कंपनी बनली आहे.
विलीनीकरणाची योजना कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या उद्योग मंदीचा सामना करण्यासाठी करण्यात आली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्स दोन्ही थिएटर व्यवसायातील मोठ्या कंपन्या आहेत. कोरोनाच्या काळात या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे, ज्याची आता भरपाई केली जात आहे. दुसरीकडे, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइमसारख्या ओटीटी त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत, जे सिनेमा थिएटर उद्योगासाठी एक मोठा धोका बनत आहे.