नाशिकः प्रत्येकालाच मोक्षाबद्दल,मुक्तीबद्दल कुतुहल निर्माण होते, ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया नसेल ना असंही आपणास वाटणे स्वभाविक आहे. याच मोक्ष या संकल्पनेबरोबरच याच वाटेवरील वासना,अहंकार,राग आणि प्रेम,मौन,प्रार्थना,साधना अशा वेगवेगळ्या बाबीं प्रवचनाच्या संवादी भाषेत मांडण्याचा सुंदर प्रयत्न मन तरंग या पुस्तकातून करण्यात आला आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.
भोसला महाविद्यालयाच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन व चार्टर्ड अकौंटट हेरंब गोविलकर यांच्या मनतरंग मोक्षाचे…या पुस्तकाचे प्रकाशन आज प.पू.प्रकाश प्रभुणे महाराज, वेदमूर्ती प. पू.सूर्यकांत राखे गुरुजी,ह.भ.प.चरोळीकर जोशी महाराज यांच्या हस्ते झाले. दुपारी नारायणकाका ढेकणे महाराजन आश्रमात आभासी पध्दतीने कार्यक्रम झाला.आगळावेगळा विषय हाताळणाबद्दल डॉ.गोविलकर यांनी श्री.हेरबं गोविलकर यांचे अभिनंदन केले. साधक मग तो कुठलाही असो त्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या विविध बाबींविषयी कुतुहल असते. अध्यात्मिक वाट निवडून आपली वाटचाल करणाऱ्या किंबहुना त्यासाठीच वाहून घेतलेल्या साधकाला पडणारे प्रश्न वेगळेच असतात. त्याचाच वेध या पुस्तकांतून घेण्यात आलेला आहे. स्वनुभव आणि मनुष्याला सतत पडणाऱ्या प्रश्नांवर एक मार्मिक भाष्य यातून झाले आहे. मोक्ष या संकल्पनेची उजळणी होऊन साधकाची निर्विकल्प साधना होण्यास मदत व्हावी, एवढी माफक अपेक्षा यातून दिसते.
समर्थपणे चिंतन करण्याचा प्रयत्न
श्री.प्रभुणे महाराज म्हणाले की, मन तरंग पुस्तक वाचल्याने त्यातून आपल्याला आत्मिक आनंद प्राप्त होतो.. नाविन्यपूर्ण विषय निवडल्याबद्दल लेखकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. केवळ पुस्तक लिहिणे हा यामागील उद्देश नाही तर साधकांला नियमित पडणाऱ्या प्रश्नांचा वेध घेतल आहे. गोविलकरांची भाषाशैली ओघवती असून विचारांची गुंफण सुसंगत वाटते, त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. यावेळी ह.भ.प.चरोळीकर जोशी महाराज,राखे महाराज यांनी शुभेच्छांपर संवाद साधला. हेरंब गोविलकर यांनी प्रास्ताविक केले. निखील प्रभुणे यांनी सुत्रसंचालन केले. राजेंद्र सराफ यांनी प्रार्थना म्हटली.