रमेश चिल्ले
ज्येष्ठ कवीमित्र लक्ष्मण महाडिक यांचा ‘स्त्री कुसाच्या कविता ’ हा दुसरा कवितासंग्रह. ग्रामीण मराठी कवितेत त्यांनी ठळक अक्षरात आपली नाममुद्रा उमटवली आहे; कारण ‘कुणब्याची कविता’ या सोळा-सतरा वर्षापूर्वी आलेल्या पहिल्या संग्रहाने साऱ्या महाराष्ट्रातील चोखंदळ वाचकांचे लक्ष वेधलेले. गावखेड्यातील कष्टकऱ्यांची, बारा बलुतेदारांची, अपार कष्टाची, मातीमध्ये मळलेल्यांच्या करूणेची, कुणबी म्हणून जगताना त्यांच्याबरोबर त्यांच्या संसाराची होणारी वाताहत, तेथली मानसिक, आर्थिक व सांस्कृतिक पडझड या कवितेतून त्यांनी चितारली आहे. अशा या अंर्त:मुख व्हायला लावणाऱ्या कवितेची अनेकांनी दखल घेतली. थेट दहावीच्या पाठ्यपुस्तकातही ती विराजमान झाली.असा बहुमान फार कमी कवींच्या वाट्याला येतो. त्यातलेच लक्ष्मण महाडिक हे एक ठळक नाव. शेतकऱ्यांच्या एकूणच वाताहतीची ही कविता दखल घेते म्हटल्यावर ती सर्वसामान्याची होऊन जाते.
दिसामासी एखादी कविता अन् वर्षाला एक-दोन संग्रह प्रसवणारा हा कवी खचितच नसून; पिंपळगाव बसवंत सारख्या द्राक्षपट्ट्यातील ग्रामीणभागात वर्षानूवर्ष अध्यापनाचे क्षेत्रात जगताना, भोगताना आलेले अनुभव, आजूबाजूच्या,सहवासातल्या वाचलेल्या चेहऱ्यामागचे कारूण्य, रूदन आतमध्ये पचवून-मुरवून संयतपणे त्यावर तब्येतीने लिहिणारा प्राचार्य कवी म्हणून मला महत्वाचा वाटतो.काही जण छंद म्हणून कविता लिहितात. काहीजण कवी होण्यासाठी लिहितात.काहीजण प्रतिभा प्रसवण्यासाठी लिहितात. पण काही जणांसाठी कविता लिहिणे अपरिहार्य होतं. ते व्रत घेऊन कविता लिहितात, कारण ती लिहिल्याशिवाय चैनच पडत नाही.सहजासहजी जगताच येत नाही. मनातील घुसमटीचा टाहो फोडताच येत नाही. कवी आणि कविता यांच्यातलं द्वैत संपून जातं. दोघेही परस्परात तादात्म्य पावतात. अशावेळी आतून पाझरतात त्या सुंदर कविता…. सकस आणि परिणामकारक, हादरवून सोडणाऱ्या आणि विचाराच्या गर्तेत खोलवर फिरवणाऱ्या. स्त्रीच्या आतिव दु:खाच्या, तिच्या जगण्या-भोगण्याच्या कविता लिहायला अनेक वर्षे जावी लागली म्हणून ह्या अशा स्त्री सुक्ताच्या कविता जन्माला आल्या.
लक्ष्मण महाडिक यांचे चिंतन आत्यंतिक खोलवर असून, स्त्रीमनाचे दु:ख आईच्या काळजाने जाणून घेण्याची आत्मिक संवेदना त्यांचे ठाई जाणवते. तसे पाहता त्यांचा कवितेचा स्वर सरळ व साधा तसेच आशय समजण्याजोगा असाच आहे. लेखनात अलंकारीकपणा कुठेच जाणवत नाही. छापील संस्कृतीची कुठेही मोडतोड नाही की कुठला अकांडतांडव नाही. त्यांच्या चिंतनाचे क्षेत्र खूप विस्तृत व संयमीत आहे. एखाद्या कवयित्रीने जेवढ्या बारकाव्या-तपशीलासह स्त्री रूदन मांडावे तशी त्यांनी ‘स्त्री कुसाच्या कवितेची’ डोळसपणे मांडणी केली आहे. स्त्रीची भावात्मकता जपत जपत तिच्या अस्तित्वाचा शोध घेण्याकरीता हा काव्यप्रपंच केलेला मला जाणवतो. एखादा हजार पानाचा ग्रंथ लिहिणे सोपे पण त्याहूनही हे कठीण काम त्यांनी केले आहे. आतापर्यंत अनेकांनी अनेक भाषांत स्त्रीवर भरभरून लिहिलयं, पण या तोडीचं क्वचीतच असेल असंही मी म्हणेन.एकंदरीत कवितांना त्यांनी सहा सुक्तात म्हणजे विभागात, चरणात बसवले आहे. त्यांच्या नावातून त्यांचा दृष्टिकोन लक्षात येईल. प्रत्येकावर एक एक स्वतंत्रलेख व्हावा अशा आशयाची ही सुक्त आहेत.
‘धुरकटलेल्या दिव्यांच्या घुसमटलेल्या वातीचं’ : अकरा कवितांच्या या सुक्तात एकमेकात ती गुंफलेली दिसते. एकाच परिस्थितीत तू अडकून राहू नकोस. बंधमुक्त हो,स्वत:ला हतबल समजू नकोस. तू ज्योतिबांची अन् सावित्रीचीही लेक आहेस. शीक, मोठी हो. तुला थांबता येणार नाही, उठावेच लागेल. तुझ्या पायातले दोरखंड तोडून टाक.चालताना वाटेवरचं प्रत्येक पाऊल समजून उमजून टाक, मात्र मागे वळू नको, ही समज या सुक्तातून कवीला द्यायची आहे. ‘मुक्या कळ्यांच्या उमलत्या पाकळ्यांच’ : मुक्या कळीचं फुलात रूपांतर होण्याचं वय फार गुंतागुंतीचं अन् अवघड असतं. आयुष्याच्या रांगोळीचा ठिपका रेखीत, पहिला पाऊस झेलीत तुझ्या आयुष्याचं रिंगण तुला आखावं लागेल. हातावरली हळवी मेहंदी रेखताना तुझे दिवस फुलतील अन् हळव्या कोपऱ्यात काहूर माजेल. तेंव्हा पोरी जरा जपून पाऊल टाक . ‘वहिवाट नाकारणाऱ्या वाटाचं’ : आडव्या तिडव्या वहीवाटीतून तुला तुझा रस्ता शोधावा लागेल. त्यातून तुझं सुक्त लिहावं लागेल. स्वत:च्या सारीपाटावर स्वत:चा डाव मांडावा लागेल. अशी भूमिका घेऊन येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत भविष्याचा विचार करून आयुष्याचा झोका उंच घेऊन अख्खे अवकाश व्यापून टाकावे लागेल तरच शिकल्याचा फायदा होईल.
‘आत्मस्वरातल्या आर्त प्रार्थनांचं’ : पाटीवरची अक्षरं गिरवीत गिरवीत स्वत:ची स्पेस शोधून ती आता लढायला तयार होते आहे. आपला आत्मस्वर वर्तमानातल्या परिस्थितीत किती मजबूत आहे हे कळायला हवे; नाही तर ‘ पाण्याच्या काठाशी रित्या घागरीचं’ : मनातल्या दु:खाला, भावनेला रितं करणारी दुसरी जागा पाणवठ्याशिवाय गावात असतेच कुठे? एकमेकीचं दु:ख वाटणारी, थोडसं हलकं होणारी जागा म्हणून तिथल्या काठावरच दु:खाच्या असंख्य घागरी युगानुयुगे रित्या होताना दिसतात. इंथ तिथं चोहीकडं. ‘ओल्या मातीच्या हिरव्या वाटेचं’ : आयुष्याच्या ओल्या मातीच्या वहिवाटीत स्वत:त कुठं तरी आई अन् बाप शोधत बाईपणाच्या जन्माची चित्तरकथा ऐकवावी असेही वाटून जाते ….स्त्रियांच्या वाटेला आलेलं पिढ्यान् पिढ्यांचं अभावग्रस्त अन् दुय्यमपणाचं जगणं हा इतिहास कोणीही नाकारू शकणार नाही. तिच्या वाट्याला अवहेलना, अपमान हा पदोपदी पेरलेला. तिचं अनेकांकडून अनेक कारणांनी होणारे शोषण; सगळेच तिच्यावर अधिकार गाजवणारे आढळतात. तिचे शारीरिक अस्तित्व पुरूषांसाठी महत्त्वाचे वाटणारे इतर अस्तित्त्वच नाकारलेले. आतापर्यंत तिच्या बौद्धिक वाढीला, तिच्या कुवतीला वावच दिला गेला नाही. इतिहासात जेंव्हा केंव्हा एखादीच्या वाट्याला ही संधी मिळाली तेंव्हा तिने त्याचे सोनेच केलेले दिसून येते. तिथेही पुरूषी अहंकाराने तिचा घात केलेला.म्हणून तिला नेहमी आपल्या वर्चस्वाखाली चार भिंतीत कोंडलेले अन् उंबऱ्याआड आडवलेले.पुरूषसत्ताक मानसिकता इतिहासाच्या अगोदरपासून ते थेट आजच्या आधुनिक काळापर्यंतचे दाखले पदोपदी पहायला मिळतात. काही मोजके अपवाद वगळता…‘इतिहासाच्या फटीतनं बाहेर डोकावताना / स्वच्छ नितळ आकाशाचा वेध घेताना /मी सूर्याचा पहिला किरण पकडू पाहते / तेंव्हा कित्येक पिढ्यांचा काळोख / माझ्या अंगावर चालून येतो’ खरं तर स्त्रीच्या वाटेला असे अभावग्रस्त दुय्यमपणाचं जगणं का आलेलं असेल?
लक्ष्मण महाडिकांची कविता स्त्रियांमधील एकाकीपणाला बळ देते, विश्वास देते. तिला वर्तमानाशी एकरूप व्हायचं आहे, आनंदी व्हायचंय, पण दु:खच चोहीकडून चाल करून येतेय. ‘तुम्ही साऱ्याच सावित्रीच्या लेकी / परंपरेचं जोखड तोडून बाहेर पडलात / आणि चालू लागलात प्रकाशाच्या दिशेनं / गुलामीच्या अंधारातले कवडसे मागे टाकत /माजघरातनं उंबऱ्याकडे’ परंपरेची लादलेली जोखडं तोडायला लावणारी ही बंडखोरी सावित्रीच्या लेकीच करू जाणे. पुढची रचना पाहू….
‘पोरी …! तू जल्माला आलेली तेंव्हा / पहिल्यांदा टोचले तुझे कान / कुणाचे काहीबाही ऐकून / तू जास्त शहाणी सुरती होऊ नये म्हणून’ संस्कार म्हणून आम्ही तिला कशा पद्धतीने बंधनात अडकवले, पुरूषसत्ताक वर्चस्वाचे अनेक पुरावे संग्रहभर आढळतात.भारतीय समाजरचनेत स्त्रियांच्या सांस्कृतिक अवकाशाला व्यवस्थेने फार मोठ्या मर्यादा घालून दिलेल्या हे आढळून येते. जन्मजातच ती खूप समजदार असते. प्रत्येक पावलागणीस ती स्वत:ला सांभाळते. प्रत्येक पाऊल फार विचारपूर्वक टाकते, कारण तिला पदोपदी अविश्वासाचे सुरूंग पेरलेले दिसतात.‘रांगोळीचा पहिला ठिपका रेखताना / शंभरदा विचार करतात पोरी / मग जोडत जातात ठिपके आयुष्याचे अंगणभर / अगदी सराईतपणे’ किती समतोल शब्दात आयुष्याचं गणित मांडलेलं आढळतं. शिक्षणाची दारे खुली होण्यापूर्वी तिला तिचा आत्मजाणीवेचा स्वर मांडता येत नव्हता. त्यावर दीर्घकाळ पुरूषी रचिताचा मोठा प्रभाव होता. आता तिच्या या आत्मसन्मानाला नव्या वाटेचा प्रकाश लाभला आहे.
ग्रामीण स्त्रीचे श्रद्धाविश्व हे कुटुंब,नातीगोती ही होतीच, तर तिला माहेरपणाचीही तितकीच असोशीही आहेच.आत आणि बाहेर सारखे काहीतरी ढासळत असताना जगण्यावरची श्रद्धा ढळू नदेता ती नवी उमेद स्वत:त रुजवत असते. दाहक अनुभवाची अनेक पदरी मांडणी करणारी कविता लक्ष्मण महाडिक लिहून जातात. त्रिशंकुसारखं लोंबकाळणारं जगणं अनुभवणाऱ्या स्त्रियांच्या पिढीच्या घुसमटीची ही कहाणी आहे. तसेच हरवलेल्या चेहऱ्यांच्या पिढ्या व त्यांचा हरवलेला आवाज अन् यांच्या फिर्यादीची ही कहाणी आहे; म्हणून मला हा कवी भावतो.खरंतर हा संग्रह म्हणजे स्त्रीचे उदात्तीकरण तर नव्हेच नव्हे! शतकानुशतके पिचलेल्या माय माऊलीला या निमित्ताने महाडिकांनी अर्थ प्राप्त करून दिला आहे. तिची घुसमट, गुदमरलेपण अधोरेखित केले आहे. मुळात ती मातृत्वाची जननी, निर्माती, हळवी,कोमल, प्रेमळ स्त्री तरीही त्याच्याच बंधनात अडकलेली. ओझं पेलणार नाही एवढ्या मर्यादा सांभाळून त्याखाली दबलेली. पुरूषाची काळजीवाहू जोडीदार, अन्नदात्री. सध्या तरी आम्ही तिला संशयाच्या दाट धुक्यातून न्हायाळतो. पदोपदी पहारे पेरीत रहातो. तिचं अस्तित्व खूप प्रेरणादायी, मोठं अर्थवाही, व्याप्तीही तेवढीच मोठी, अतिभव्य; पण तिचे दु:ख, यातना का म्हणून पुरुषी अहमतेला दिसत नाहीत. हा न सुटणारा प्रश्न? एवढे भोग भोगणारी मायमाऊली कधीही त्याचा बाजार मांडत बसत नाही. आपल्या संसाराचा गाडा तसाच पुढे रेटीत फाटले आयुष्य रांधते, कुटुंबाला सावरते, घराचे घरपण जपते. त्यातूनही मुलाबाळांच्या ओढीनं राबत राहते.
सारं काही ठिक होईल, येतील ही चार क्षण सुखाचे, म्हणीत त्यावरच आयुष्य तोलत रहाते. पोटच्या लेकीबाळीनांही थोरलेपणानं समजावते. लेकीचा जन्मच खस्ता खाण्याचा असतो असे मनाचे समाधान करते. पुन्हा मोठ्या मनाने जोडीदाराला माफ करते. त्याचीही चूक नाहीच. पुरूष जातीचंच असं वागणंअसतं, असं स्वत:ला बजावत रहाते. अन् गुमान आला दिस बरा गेला म्हणून देवापुढे त्याच्याच भल्यासाठी नवस सायस करून कुटुंबाला बळकटी मागते. एवढ्या उदार मनाची थोर माऊली.पुन्हा बंदिनी होऊ नको/25, हातावर मेहंदी रेखताना/56, तूही तोड आता दावं/26,चेहरा नसलेल्या बायकांचे कळप/65, आयुष्याचा सारीपाट/66, मी ठरवलंय आता/60, पक्षी होऊन उडू दे/75, बायका पाण्यावर धुणं धुतात/96, जल्म बाईच्या जातीचा/99, जन्माचा फेरा/91, पोरी दप्तर घेऊन जातात/103, चिमण्या उडून गेल्या तरी/105, आई माझ्यातच बाप शोधते/113 अशा किती तरी कवितांचे दाखले देता येतील की त्या एकाहून एक सरसरचना महाडिक यांनी संग्रहभर दिल्या आहेत.
लोकसंचितातले पूर्वसंस्कार पचवून समकाळाला कवेत घेऊन आपल्या स्वत्वाची मांडणी करणारी ही कविता; आपल्या संवेदनेच्या समग्र अवकाशाला हलवून टाकणारीआहे. ‘ती आता बंधमुक्त होते आहे’ हा आशावाद शेवटी कवी प्रकट करतो. ती बोलते…चालते…लिहिते…मांडते आहे. सभा-संमेलने, साऱ्या दाही दिशा गाजवते आहे. सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवून आनंदीच्या विश्वासानं लढते आहे. शेवटी ही प्रगती दाखऊन कवी थांबत नाही तर अवकाश कवेत घेऊन मुक्तीचं नवसुक्त गात गात पुढे जाते आहे. एका संवेदनशील, हळव्या विषयाला, त्यातल्या नाजूक बारकाव्यासह कवीमित्र लक्ष्मण महाडिक यांनी मोठ्या ताकदीने वाचकांहाती हा संग्रह दिला. त्यांच्या पुढील लेखनास आभाळभर शुभेच्छा.
कवितासंग्रह : स्त्रीकुसाच्या कविता
कवी : लक्ष्मण महाडिक
प्रकाशक : शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
किंमत : १२५ रूपये
पृष्ठे : १२०
रमेश चिल्ले
‘शब्दवेल’ भाग्यनगर, जुना औसा रोड, लातूर
मो : 7507550102 (E-mail : [email protected])