मुंबई – लखनऊ ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकत महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. दरोडेखोरांनी प्रवाशांची लूट करीत महिलेवर अत्याचार केल्याची घटना कसारा ते इगतपुरी दरम्यान घडली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, चार जण फरार आहेत.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्सप्रेस लखनऊहून मुंबईला शनिवारी रात्री येत होती. त्याचवेळी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. घोटी ते इगतपुरीच्या दरम्यान हे दरोडेखोर एक्सप्रेसमध्ये चढल्याचे सांगितले जाते. आठ ते १० दरोडेखोरांनी जवळपास १५ ते २० प्रवाशांना लुटले. मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. तसेच, एका २० वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला. महिलेवर जबरदस्ती करीत असल्याने एका प्रवाशाने दरोडेखोरांना विरोध केला. चिडलेल्या दरोडेखोरांनी त्या प्रवाशाला बेदम मारहाण केला. दरोडेखोरांमध्ये इगतपुरीचे राहणारे बहुतांश असल्याचे सांगण्यात येते. दरोडेखोरांनी नशेत हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करीत आहेत.